अभिनेत्री दिव्या पुगावकरने पत्रातून मांडली आनंदीची व्यथा…
एरवी माझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष वाचता येणारी आई तू… तुला माझ्या डोळ्यातलं दुःख नाही का दिसलं? मुलींच्याच बाबतीत असं का होतं?
स्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुतकता आहे. स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर या मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार असून अभिनेता अभिषेक रहाळकर सार्थकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शुभांगी लाटकर, निनाद देशपांडे, राजश्री निकम, रमेश वाणी, पुष्कर सरद, नेहा परांजपे, आधीकी कसबे, अश्विनी मुकादम, अमोघ चंदन, प्रणिता आचरेकर, सोहन नांदुरीकर अशी तगडी कलाकारांची फौज या मालिकेत आहे.
घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. समाज तर सोडाच पण घरच्यांकडूनही त्यांना खंबीर साथ मिळत नाही. आनंदीही त्यापैकीच एक. मनात अनेक गोष्टी असताना त्या मनमोकळेपणाने मांडू न शकणारी. आई-बाबांसमोर व्यक्त तर व्हायचंय आणि त्यासाठीच आनंदीने पत्रातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.