सचिन चिटणीस…..
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागला आणि पुन्हा नाट्यगृह बंद पडली आणि यावेळेस मात्र पडद्यामागील कामगार हबकला त्याच्या डोळ्यासमोर आले ते २०२० साल त्याने काढलेले कष्ट, हातावर पोट असलेल्या या कामगाराने त्या काळात भोगलेल्या यातना आपल्याच माणसांनी फिरवलेली पाठ , जगायला आवश्यक असलेल्या गोष्टीची वानवा, हातात पैसा नसल्यावर डोक्यात उच्छाद मांडणारे भुंगे….आता पुन्हा बंद आता कसे होणार कारण २०२० मध्ये जी काही थोडीफार मदत मिळाली होती ती आता मिळणे जवळपास दुरापास्त याला कारण म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण डरे’
हीच चिंता हरीलाही पडली,
बाबूजींनी ( मच्छिंद्र कांबळी ) ज्याला ‘हातगुणाचा बुकिंग क्लार्क’ हे नाव ठेवले, जास्त न शिकताही ज्याच्या हिशोबात कधी खोट आली नाही असा शिवाजी मंदिरचा ‘स्टार व्यवस्थापक’ हरी पाटणकर आज दुसऱ्यांदा नाट्यगृहे बंद पडल्यावर मात्र निराश झाला आहे मात्र त्याची जिद्द अजूनही कायम आहे, तो म्हणतोय हे ही दिवस सरतील व पुन्हा एकदा नाट्यक्षेत्राला सोनेरी कळस लागेल पण तो पर्यंत कोणी मदत केल्यास जगणे सुलभ होईल. आज नाट्यक्षेत्रात बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक, रंगमंच कामगार काम करीत आहेत पण त्यांना कोणीही मदत देत नाही आणि लक्ष ही देत नाही आहेत.
तरी यांचा वाली कोण ?
याचे उतर कोण देणार का ?
आता आम्ही करायचे तरी काय ?
हरीला पडलेले हे प्रश्न आज प्रत्येक क्षेत्रात कोणाला ना कोणाला तरी पडलेले आहेत पण त्याची उत्तरे मात्र कोणालाच माहीत नाहीत कारण या कोरोना महामारी पुढे सगळेच हतबल झाले आहेत.