२०२० या वर्षाला गुडबाय करून २०२१ चे स्वागत करण्याचे वेध संपूर्ण जगाला लागले आहेत. या वर्षातील कटू आठवणी पुसून, नवी स्वप्न साकार करण्याची वेळही जवळ आली आहे. नवीन वर्षात मराठी सिनेसृष्टीही रसिकांसाठी नवनवीन सिनेमांची मेजवानी घेऊन येणार आहे. ‘डार्लिंग’ या मराठी सिनेमाच्या रूपातील पहिले पुष्प ७ जानेवारी २०२१ रोजी रसिक दरबारी सादर केले जाणार आहे. या सिनेमातील ‘ये है प्यार…’ हे नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘डार्लिंग’च्या टायटल सॉंगनं रसिकांवर मोहिनी घातली असताना ‘ये है प्यार…’ हे गाणंही संगीतप्रेमींचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झालं आहे. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पत्के फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा सिनेमा बनवला आहे. दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या समीर आशा पाटील यांनी प्रेमकथेतील आजवर कधीही न उलगडलेले पैलू ‘डार्लिंग’मध्ये सादर केले आहेत. यातील गीतकार मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या ‘ये है प्यार …’ प्रेमगीताला चिनार-महेश या संगीतकार जोडीनं स्वरसाज चढवला आहे. गायक चिनार खारकर आणि गायिका सोनाली पटेल यांच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. अभिनेत्री रितिका श्रोत्री, प्रथमेश परब आणि ‘लागिर झालं जी’ फेम अभिनेता निखिल चव्हाण या गाण्यात झळकणार आहे.
कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद सादरीकरण आणि कलाकारांची अनोखी केमिस्ट्री हे ‘ये है प्यार …’ या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. या गाण्यासाठी कलाकारांच्या लुकपासून कॉस्च्युमपर्यंत बऱ्याच गोष्टींवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चिनार-सोनाली यांच्या आवाजाची जादू या गाण्यात आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे, त्यामुळं हे गाणं रसिकांना एक वेगळी अनुभूती देणार ठरेल असा विश्वास दिग्दर्शक समीर आशा पाटील यांना आहे. हे गाणं संगीतबद्ध करताना संगीतप्रेमींना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि अनोखं देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं चिनार-महेश यांचं म्हणणं आहे. ७ जानेवारी २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.