सचिन, आता सगळीकडे ऑनलाईन ट्रांजेक्शन सुरू झाली आहेत त्यासाठी मी कोणते ॲप घेऊ.
सचिन, वॉईस रेकॉर्डर घ्यायचा आहे कोणता घेऊ.
अगदी रोज काहीना काहीतरी विचारण्यासाठी आमचे DG म्हणजेच दीनानाथ घारपुरे यांचा मला फोन येत असे. माझा मुलगा आयटी इंजिनिअर असल्याने व त्याने आज पर्यंत सांगितलेल्या वस्तू चांगल्या निघाल्याने DG चा त्याच्यावर पूर्ण विश्वास. मोबाईल फोनमध्ये कोणतेही नवीन ॲप येवो DG चा फोन यायलाच हवा. “वेळ आहे का ? बोलू शकतो ना ! ” आकाशवाणी येथे अधिकारी पदावर काम केलेले DG इतके नम्र कसे याचे कोडे मात्र मला कधीच उलगडले नाही.
त्यांची कितीही मस्करी करा, मात्र या माणसाला मी रागावलेला कधीच पाहिला नाही ते नेहमी अशा गोष्टी हसून टाळायचे.
आम्ही मस्करीत मस्करीत त्यांना नेहमी म्हणायचो DG आता तुम्ही ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार आहात तिथे अमिताभ बच्चन चे केस पांढरे झाले. तुमचे मात्र अजुन काळेभोर कसे काय ? याला मात्र ते मनापासून दाद द्यायचे.
ह्या माणसाचा मित्रपरिवार प्रचंड, प्रचंड ओळख अगदी महाराष्ट्रभर कुठेही जा या माणसाचा ओळखीचा माणूस त्या गावात नाही असे कधीच झाले नाही, याचा अनुभव मी प्रत्येक नाट्यसंमेलनाला घेतला आहे. हा माणूस वेळेचा एकदम पक्का मात्र समोरच्याला उशीर झाल्यास DG ची कधी तक्रार नसायची. गोड खाणे त्यांना प्रचंड आवडायचे मुख्य करून आईसक्रिम.
बातमी मिळवण्यासाठी या माणसाची नुसती धावपळ असे. वयाच्या 79 व्या वर्षी आपले स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करणारा हा तरुण मला वाटते एकमेवाद्वितीय असावा.
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या माणसाच्या गिरगाव येथील घरी मुंबईत आल्यावर एक वर्ष पेईंग गेस्ट म्हणून राहत होते ही गोष्ट आम्हाला DG नं कडून नाही तर मोहन जोशी यांच्या पुस्तकातून कळली. त्याच प्रमाणे नटसम्राट श्रीराम लागू यांच्या बरोबर सुद्धा या माणसाने एका नाटकात त्याकाळी काम केले आहे.
कोणत्याही प्रकारची मदत मागा हा माणूस एका पायावर तयार, अशा या माझ्या मित्राला ( भले मग माझ्यात आणि त्यांच्यात 23 वर्षाचे अंतर का असेना ) कोरोना सारखा आजार व्हावा आणि काहीही न बोलता त्याने या जगातून एक्झिट घ्यावी हे मनाला न पटणारे न उमजणारे असे अत्यंत क्लिष्ट असे कोडे आहे.
आज त्यांना श्रद्धांजली वाहतांन एकच म्हणावेसे वाटते ” मित्रा तू इतक्या लवकर जायला नको होतास ”
…………………………….सचिन चिटणीस.
मित्रा, तू इतक्या लवकर जायला नको होतास……
+1
+1
+1
+1