लग्नघरातल्या धावपळीचा कर्ता-धर्ता ‘नारायण’ याची ओळख पु.ल देशपांडे यांनी आपल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घडवलीच आहे. आगामी ‘बायको देता का बायको’ या मराठी चित्रपटातूनही हा नारायण आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेता सुनील गोडबोले यांनी आपल्या अनोख्या ढंगात ही व्यक्तिरेखा रंगवली आहे. चित्रपटातील हा ‘नारायण’ काहीशा वेगळा आहे. मांडवात मदतीला हजर असणारा हा ‘नारायण’ सामाजिक जबाबदारी म्हणून विवाह जमवण्याचे काम सुद्धा चोखपणे करतो. वाय डी फिल्मस्’ निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हा धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लग्न म्हणजे दोन कुटुंबांमध्ये, त्यातील व्यक्तींमध्ये नातेसंबंध निर्माण करणारे सामाजिक बंधन. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं लग्न चांगल्याप्रकारे व योग्य अनुरूप स्थळाशी व्हावं अशी अपेक्षा असते. आधुनिक युगातला हा नारायण अत्यंत शिताफीने ही स्थळ जुळवतो पण ती जुळवताना तो काय आणि कशा करामती करतो? हे रंजकपणे ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या भूमिकेबद्दल बोलताना सुनीलजी सांगतात की, स्पष्टवक्तेपणा आणि विचारी फटकळपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. लग्नाच्या बाजारात काय खपतं? फक्त सौंदर्ये, तारुण्य आणि पैसा! या तीनच गोष्टी खपतात. गुण, चारित्र्य, संस्कार चालीरीती यांचा विसर पडत चालला आहे तो करून देण्याचा प्रयत्न हा ‘नारायण’ या चित्रपटात करताना दिसणार आहे.
सुनील गोडबोले यांच्यासह सुरेश ठाणगे, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, अभिलाषा पाटील, प्रतीक पडवळ, सिद्धेश्वर झाडबुके, किशोर ढमाले, अमोल पठाडे, प्रीतम साळुंखे, हनुमंत गणगे, प्रमिला जगताप, वैष्णवी अनपट, वैशाली जाधव, राणी ठोसर, प्रशांत जाधव, महादेव सवई, अश्विनी वाव्हळ, संगीता कोठारी या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.