डॉ. अमोल कोल्हे यांची ‘जगदंब क्रिएशन्स’ करणार तीन ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती
“माझ्या चित्रपटात महाराज अस्सल दिसतील त्यांना मला कुठेही सुपर हिरो बनवायचा नाही आहे आणि म्हणूनच माझ्या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर अगदीच कमी असेल.” डॉ.अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील तेजोमय घटनांचे महान पर्व ‘शिवप्रताप’ ‘वाघनखं’, ‘वचपा’, ‘गरुडझेप’ या तीन चित्रपटांची घोषणा नुकतीच मुंबईत केली त्यावेळेस ते ‘मुंबईन्यूज’ 24×7 शी बोलत होते.
एखाद्या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट साकारला जाण्याची माहिती समोर आली, की प्रेक्षकांमध्ये आपोआपच कुतूहल निर्माण होत असते. नाटक व मालिकांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडल्यानंतर अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील तेजोमय घटनांचे महान पर्व ‘शिवप्रताप’ या तीन चित्रपटांच्या मालिकेतून रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. रुपेरी पडद्यावर यानिमित्ताने शिवशाही अनुभवायला मिळणार आहे. डॉ. अमोल कोल्हे, डॉ. घनश्याम राव, विलास सावंत या चित्रपटांचे निर्माते आहेत.
यातील ‘वाघनखं’ हा पहिला चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कार्तिक केंढे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. येत्या जानेवारीपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या आणि शौर्याच्या जोरावर अफझलखानाचा वध कसा केला? हे ‘वाघनखं’ चित्रपटातून दिसणार आहे. अफझलखानाच्या वधानंतर महाराजांच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने पाठवलेल्या शाहिस्ताखानाला पळवून लावल्यानंतर रयतेची झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सुरतेची मोहिम आखली. आणि शाहिस्ताखानाने केलेल्या नुकसानीचा ‘वचपा’ काढला. हा वचपा महाराजांच्या राजनीतीशास्त्राचा अद्भुत चमत्कार होता. महाराजांच्या अनोख्या राजनीतीचा हा पैलू ‘वचपा’ चित्रपटातून पाहता येणार आहे. राजकीयदृष्ट्या आग्र्याहून सुटका ही हिंदुस्थानच्या इतिहासातील अद्वितीय गरुडझेप होती. ही गरुडझेप घेतानाचे महाराजांचे राजकीय डावपेच, बुद्धिचातुर्य आणि दूरदृष्टी याची झलक ‘गरुडझेप’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. शिवरायांचे हे प्रेरणादायी जीवनकार्य देशभरात आणि देशाबाहेर पोहचविण्याच्या उद्देशाने या तीनही चित्रपटांची निर्मिती मराठीसोबत हिंदी भाषेतही होणार आहे.
याबद्दल बोलताना अमोल कोल्हे पुढे सांगतात की, ‘इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. लोकोत्तर नेतृत्व नकळत अनेक जीवनमूल्ये देऊन जातात. ‘शिवप्रताप’ चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही हे प्रेक्षकांसाठी आणणार आहोत. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आणखी तीन चित्रपटांची घोषणा करण्यात येणार आहे. आजच्या तरूणांपुढे एक आदर्श उभा करण्याचं आणि त्यांना दिशा दाखवण्याचं काम या चित्रपटाच्या निमित्ताने होईल. त्यामुळे या चित्रपटांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.