मी कधी नव्हे ते पहिल्यांदा स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचले आहे. ह्या अश्या बाजाची गाणी मी कधीच रचली नव्हती. त्यामुळे ही गाणी करताना भलतेच टेन्शन आले होते. कारण अंतिमत: ती कशी होतील, याची पूर्ण कल्पना नव्हती. परंतु, दिग्दर्शक व निर्माता यांचा विश्वास मी सार्थ ठरवला. याचे मला समाधान आहे.” असे उद्गार संगीतकार अशोक पत्की यांनी ‘बकाल’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्या दरम्यान व्यक्त केले.
वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी बकाल ह्या भव्यदिव्य ॲक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी देणारे अशोक पत्की यांचा पाश्चिमात्य शैलीतील हा संगीत प्रयोग पाहून संगीतविश्वात त्यांचे खूप कौतुक होत आहे. बकाल ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध छायाचित्रणकार समीर आठल्ये ह्यांनी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचे परमस्नेही अशोक पत्की यांच्यावर सोपवली. पण चित्रपटाचा बाज हा तरुणाईशी निगडीत असल्याने आधुनिक पद्धतीचे पाश्चिमात्य शैलीचे संगीत निर्माण करावे लागेल, जे आपण कधीच केले नाही. हे जाणून अशोक पत्की यांनी समीर आठल्ये ह्यांना नकार दिला. तरीही समीर आठल्ये यांनी त्यांना संगीत दिग्दर्शन तुम्हीच करा, असे आग्रहाने सांगितले.
“मी नेहमी प्रमाणे हार्मोनियमवर गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनांना चाली लावल्या आणि संगीत संयोजक मणी यांना ऐकवल्या. पण, मणी ह्यांच्याही हे संगीत आवाक्याबाहेरचे होते. म्हणून मणी यांचे चिरंजीव सनी ह्या नव्या दमाच्या डीजे स्टाईल संगीत संयोजकाकडून काम करून घेतले. आणि त्यानंतर मला स्वत:वरच विश्वास बसेना. माझ्या ह्या नव्या प्रयोगावर ज्या पद्धतीने संगीत संयोजन झाले ते पाहून समीर आठल्ये सकट साशंक असलेली चित्रपटाची संपूर्ण टीम अवाक झाली.
एकूण पाच गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नागपूरचे गीतकार सुरेंद्र मसराम आणि संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी मारबत विशेष गाणे रचले आहे. अशोक पत्की यांची तीन गाणी ही सर्वांनाच थिरकायला लावणारी आहेत आणि आत्ताच्या भाषेत बोलायचे तर डान्स नंबर्स आहेत. एक गाणे स्फुर्तीगीत आणि पाचवे गाणे आयटम साँग आहे. यशराज स्टुडीयोच्या विजय दयाल यांनी ह्या गाण्यांचे मिक्सिंग केले आहे. सिद्धार्थ महादेवन, अमेय दाते, जसराज जोशी, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे, माधुरी करमरकर, जान्हवी अरोरा, कविता राम, प्राजक्ता रानडे, धनश्री देशपांडे, अमृता दहीवेलकर आदी नव्या दमाच्या गायकांनी ह्या गीतांना स्वरसाज चढविला आहे. दिलीप मेस्त्री आणि दीपा मेस्त्री ह्या नृत्य दिग्दर्शकांनी त्यावर कळस चढविला आहे.
बकाल ह्या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला चित्रपटातील कलाकार गणेश यादव, यतीन कारेकर, पुजा नायक, नवोदित अभिनेता चैतन्य मेस्त्री, जुई बेंडखळे, गायक हृषिकेश रानडे-प्राजक्ता रानडे, दिग्दर्शक समीर आठल्ये, निर्माता राजकुमार मेन्डा, सोनू मेन्डा, नृत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्री-दीपा मेस्त्री, फाईट मास्टर अंदलीब पठाण, लेखक अभिराम भडकमकर, मिलिंद सावे, वितरक समीर दिक्षीत-हृषिकेश भिरंगी आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकुमार मेन्डा निर्मित शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत मराठीतील पहिला भव्यदिव्य ॲक्शनपट ‘बकाल’ येत्या ८ नोव्हेबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.