मराठी संगीत रंगभूमीवर अनेक संगीतमय सुरावट असलेली नाटके सादर झाली. संगीत रंगभूमीला एक परंपरा आहे. अनेक नामवंत कलाकार संगीत नाटकाने रंगभूमीला दिले. बालगंधर्व, मा. दीनानाथ, जयमाला शिलेदार, किर्ती शिलेदार, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार, यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी रंगभूमी गाजवली. संगीत रंगभूमीवर स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, जयजय गौरीशंकर, मंदारमाला, पंडितराज जगन्नाथ , सुवर्णतुला, भावबंधन, पुण्यप्रभाव, एकच प्याला, यांसारखी अनेक दर्जेदार नाटके सादर झाली. त्याचा आस्वाद रसिकांनी पुरेपूर घेतला.
जुनी गाजलेली संगीत नाटके आजच्या युगात रसिकांसाठी सादर करण्याचे बहुमूल्य काम निर्माता/ दिग्दर्शक/ अभिनेते विजय गोखले यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या ”रंगशारदा प्रतिष्ठान ” ह्या लोकप्रिय नाट्यसंस्थे तर्फे ” शब्दप्रभू नाटककार राम गणेश गडकरी यांचे ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक सादर केले आहे. संगीत रंगभूमीवर नवनवे तरुण/ कलाकार येत आहेत. त्याच्यात ताज्या दमाचे – संग्राम समेळ, अंशुमन विचारे, संपदा माने, असे अनेक कलाकार आहेत. त्यांच्या कडून संगीत एकच प्याला चा प्रयोग बंदिस्तपणे विजय गोखले यांनी दिग्दर्शित केला आहे. या नाटकाची रंगाकृती आणि दिग्दर्शन विजय गोखले यांनी केल असुन संगीत मार्गदर्शन अरविंद पिळगावकर यांनी केले आहे. संगीतसाथ ऑर्गनवर केदार भागवत यांची साथ लाभली आहे व तबला सुहास चितळे यांनी वाजवला आहे. नाटकाचे देखणे वास्तववादी नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले आहे. नाटकाची प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. नाटकाची निर्मिती सविता गोखले यांनी केली असून या नाटकामध्ये संपदा माने, शुभम जोशी, शुभांगी भुजबळ, अंशुमन विचारे, संग्राम समेळ, रोहन सुर्वे, शशिकांत दळवी, दीपक गोडबोले, विजय सुर्यवंशी, मकरंद पाध्ये, विक्रम दगडे या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.
संगीत एकच प्याला या नाटकात सुधाकर, सिंधु, यांच्या संसाराची कथा असून त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात, आणि त्यामुळे त्यांच्या संसाराची घडी विस्कटू लागते.त्यांच्या संसाराची वाताहात सुरु होते आणि त्याला कारणीभूत असतो दारू चा एकच प्याला, दारूचे व्यसन हे अत्यंत वाईट ते सुटता सुटत नाही,एका दुःखाच्या प्रसंगात सुधाकर यांची मानसिकता बिघडते आणि त्यावेळी तळीराम हा त्याला दारूच्या व्यसनात बुडवतो. तो सुधाकरला सांगतो कि बिघडलेली मानसिकता विसरण्यासाठी दारू हा मोठा उपाय असून त्याने ताजे टवटवीत वाटते असे अजब तत्त्वज्ञान तळीराम त्याला सांगतो. सगळ्या दुखण्या वरती दारू हा रामबाण उपाय आहे, दारुड्या माणसाच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टी तो तळीराम हा सुधाकर यांना समजावून सांगतो, नाटकाची कथा सर्वाना माहित आहेच, ती काही सांगत नाही. सुधाकरची भूमिका संग्राम समेळ, तळीरामाची भूमिका अंशुमन विचारे, सिंधूची भूमिका संपदा माने, गीताची भूमिका शुभांगी भुजबळ, रामलाल ची भूमिका शुभम जोशी यांनी बहारदारपणे रंगवल्या आहेत. संपदा माने यांनी सर्वच गाणी दमदारपणे सादर केली आहेत.
एकच प्याला नाटकाचा पहिला प्रयोग २०फेब्रुवारी १९१९ मध्ये गंधर्व नाटकमंडळीने सादर केला, त्यानंतर ६फेब्रुवारी १९२० मध्ये बळवंत संगीत मंडळीने प्रयोग सादर केला. आणि अजून ही हे नाटक दमदारपणे सादर केले जात आहे. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले दमदार संवाद आजची तरुण कलाकारमंडळी समर्थपणे सादर करतात. नाटकामधील संगीत अजूनही रसिकांच्या मनात घर करून राहिले आहे. एकच प्याला हे पांच अंकी असलेले नाटक त्याची रंगाकृती विजय गोखले यांनी समर्थपणे साकारली असून . त्यामध्ये नाटकाचा संपूर्ण गाभा व्यवस्थितपणे मांडला आहे. दोन अंकांमध्ये हे संपूर्ण नाटक सादर केले असून . त्याचे सर्व श्रेय कलाकार – दिग्दर्शक सर्वांनाच आहे. एकच प्याला हे नाटक शेवटी तरूणाना संदेश देते कि “व्यसनाच्या आहारी जाऊ नका, त्याने जीवनाचा, शरीराचा, मनाचा, सर्वांचा नाश होतो. क्षणभर सुखासाठी व्यसन बरे वाटले तरी ते आपल्या नाशाला कारणीभूत ठरते.
या नाटकातील अंशुमन विचारे, संग्राम समेळ, संपदा माने, शुभम जोशी, शुभांगी भुजबळ, हे कलाकार लक्षात राहतात. नाटकातील इतर कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमपणे साकारलेल्या आहेत. एकूण एकच प्याला चा सुरेख बंदिस्त प्रयोग सर्वच कलाकारांनी उत्तमपणे सादर केला असून . या नाटकात संगीताची मेजवानी आणि अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल.