राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सरकारवर घणाघाती टीका

*राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लोकांना दिलेल्या अन्य प्रलोभनांबाबत एक चकार सुद्धा मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणात नव्हता*

*राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सरकारवर घणाघाती टीका*

*राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? – जयंत पाटील*

मुंबई :- महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत चर्चा सुरू करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधीमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ल चढवला. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लोकांना दिलेल्या अन्य प्रलोभनांबाबत एक चकार सुद्धा मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणात नव्हता. दावोस मधून किती गुंतवणूक येणार आणि किती रोजगार उपलब्ध होणार हे मात्र दरवेळीप्रमाणे नमूद केले. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील सुमारे ५० लाख तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित होते. ते फारसे दिसत नाही उलट बेरोजगारीच प्रचंड वाढली आहे असे मत त्यांनी मांडले.

उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन नको तर स्थानिक गुंडांकडून संरक्षण द्या ही उद्योजकांची मागणी आहे. ही संघटित गुंडगिरी इतकी बळावली आहे की छोट्या दुकानदारापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना खंडणी द्यावी लागते. निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असा सल्ला देत असताना सरकारचे काम आता झाले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. ही मतदारांची फसवणूक आहे. देशाच्या स्थूल उत्पादनातील महाराष्ट्राचे योगदान १.२% खाली आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमी ॲडव्हायजरी कमिटीच्या अहवालानुसार आपण गुजरातच्या तुलनेने बरेच मागे गेलो आहोत अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी व्हावी. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने नवीन वीज कनेक्शन देणारे पोर्टलच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पंपाची मागणीच करता येत नाही. ते पोर्टल पुनश्च सुरू करा अशी मागणी करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा इतिहास सांगितला तसेच संतांचे विचार सांगितले. सध्या राज्यातील परिस्थिती लक्षात घेता समतेचा संदेश देणाऱ्या या भूमीत खरंच पुरोगामित्व शिल्लक आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

IPRoyal Pawns