*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन*
मुंबई, : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक २ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.
या भव्य सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार भाई गिरकर, जयंत देशपांडे, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, मिनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे मराठी सिने सृष्टीतील अभिनेते, चित्रकार आणि साहित्यकार व रसिक प्रेक्षक याप्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभादरम्यान विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, गायक नंदेश उमप आणि रोहन पाटील यांनी आपल्या कला सादरीकरणाने कार्यक्रमास रंगत आणली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “पु ल देशपांडे यांचा एका शब्दात उल्लेख करायचा असेल तर ते महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ आहेत. त्यांच्या प्रत्येक साहित्य कृतीतून ते आपल्याला निखळ आनंद देतात. मराठी नाट्य प्रेमींनी नाटकांच्या प्रती आपली आवड जोपासलेली आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्य, संस्कृती आणि भाषेमुळे होते.”
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारने अत्यंत कमी वेळात या अकादमी आणि नाट्यगृहाचे नूतनीकरण केले आहे. रवींदनाथ टागोर आणि पु ल देशपांडे यांच्या नावाला साजेस काम याठिकाणी होत आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य स्वरुपात उभ्या असलेल्या या वास्तूच्या उभारणीत योगदान असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो.”
यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले, “कला साधक मंडळींच्या साधनेची जागा म्हणजे ही पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही एक पवित्र वास्तू असून, सर्वार्थाने पावित्र्य टिकवणारी वास्तू आहे.”
रवींद्र नाट्य मंदिराच्या जुन्या इमारतीत आधुनिक सुविधा देण्यात आल्या असून, नव्याने अंतर्गत सजावट व तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक सभागृह, खुले नाट्यगृह, नॅनो सभागृह, ऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्स उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लघु नाट्यगृहात नव्याने विकसित सुविधांमध्ये डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणा तसेच चित्रपट प्रदर्शन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. कलाकारांसाठी सुसज्ज वादन कक्ष आणि सृजनकक्ष विकसित करण्यात आले असून, पु ल देशपांडे यांचे स्मृतिदालनही सुरु करण्यात आले आहे.
प्रेक्षकांसाठी उत्तम अनुभव देणारे हे सभागृह ठरणार असून, या सुविधांमुळे कलाकारांना प्रेरणादायी वातावरण उपलब्ध होईल आणि प्रेक्षकांचा नाट्यगृहातील अनुभव अधिक दर्जेदार व आनंददायक होणार आहे.
नूतनीकरणानंतर प्रथमच विशेष महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च २०२५ पासून एक दिवसीय पु. ल. महोत्सव, रुपांगण फाउंडेशन तर्फे ‘आमार देखा कीचू नमुना’ हे बंगाली भाषेतील नाटक सादर होणार आहे, जे पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित आहे. त्याचप्रमाणे पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्यातर्फे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले ‘मॅड सखाराम’ या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे.
४ मार्च २०२५ रोजी महिला कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये लावणी आणि शास्त्रीय युगलगायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नूतनीकरणानंतर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे केंद्र आणखी समृद्ध झाले असून, कलाकारांना नवीन प्रयोगांसाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे.