हास्य आणि मनोरंजनाचा नवा सुर, ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या…’
‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या…’ समीर चौघुले छेडणार हास्य आणि मनोरंजनाचा नवा सूर
मुंबई – विनोदी स्कीट्स सादर करत घरोघरी लोकप्रिय झालेला समीर चौघुले “सम्या सम्या मैफिलीत माझ्या…” हा हास्य आणि मनोरंजनाचा नवा सूर एकपात्री छेडण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या…’ याबाबतची घोषणा समीरने सोशल मीडियाद्वारे केली आहे.
समीरचा हा कार्यक्रम जवळपास दीड तासांचा असेल. यात धमाल किस्से, गप्पा अशी मनोरंजनाची यथेच्छ मेजवानी असणार आहे. याबाबत समीरने पोस्टमध्ये प्रेम आणि लग्नाची अनोखी व्याख्या मांडत लिहिलेय की, ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या…’ प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असतं, जे संधीच सोनं करतात त्यांना संसाराची विंडोसीट मिळते… तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असतं जे नेहमी पायदळी तुडवलं जातं… तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे ‘एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस…’ लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय ‘साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणं…’ काही जणांच्या मते लग्न म्हणजे ‘मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’मध्ये उडी मारणे’ वगैरे वगैरे… ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वेगवेगळ्या व्याख्या आहेत. यातली नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल? असे लिहित समीरने रसिकांना या कार्यक्रमाला येण्याचे जणू आमंत्रणच दिले आहे. हसत-खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेच ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ अशी या कार्यक्रमाची साधी सोपी व्याख्याही समीरने सांगितली आहे.