*रुग्णवाहिका चालक व सेवा प्रदाते यांच्यावर आधारित माहितीपट मालिका*
*“सातपुडा सुपर सेव्हियर”*
*अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रोमोचे उद्घाटन संपन्न*
कोविड – १९ च्या संकटकाळात अनेक रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते कोरोनायोद्धा म्हणून लढले, त्यांची रुग्णवाहिका ही जीवनवाहिनी ठरली. जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे महत्वाचे काम या रुग्णवाहिकांनी केले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या अमूल्य योगदानाला प्रोत्साहित होऊन सातपुडा इंजिनिअरिंग नाशिक येथील एक प्रतिष्ठित रुग्णवाहिका स्ट्रेचर निर्माण कंपनी “सातपुडा सुपर सेव्हियर” या माहितीपट मालिकेची निर्मिती करत आहे. या माहितीपटाच्या प्रोमोचे उद्घाटन नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते यांना “सातपुडा सुपर सेव्हियर” हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
“सातपुडा सुपर सेव्हियर” या माहितीपटाच्या उपक्रमाला हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मनापासून पाठिंबा दिला आहे. या माहितीपट मालिकेचा प्रोमो सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित केला आहे. या प्रोमोद्वारे त्यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून लढलेल्या रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते यांच्या उल्लेखनीय कामाची माहिती देऊन रुग्णवाहिका चालक व सेवा प्रदाते यांना या उपक्रमात / मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.
“सातपुडा सुपर सेव्हियर” या उपक्रमाचा उद्देश जे आरोग्य सेवेत पडद्यामागे अथकपणे काम करत आहे, त्यांच्या उल्लेखनीय कामांवर प्रकाश टाकून, समाजातील त्यांच्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जनमानसात प्रशंसा वाढविणे हा आहे. रुग्णवाहिका संकटकाळात सेवेसाठी सदैव तत्पर असते, त्याचं कौतुक करणे गरजेचं आहे. रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदात्याना “सेव्हियर” म्हणजे तारणहार ही उपाधी दिली पाहिजे. जीवन वाचविण्यात आणि समाजासाठी योगदान देण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका मान्य केली पाहिजे. हा उपक्रम केवळ त्यांच्या मेहनतीलाच वैध करत नाही तर मनोबल वाढवणाराही आहे. या आठ भागाच्या मालिकेत रुग्णवाहिका चालकांचे वैयक्तिक अनुभव, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले धाडस यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या मालिकेची संकल्पना व दिग्दर्शन तुणीर यांचे असून निर्मिती सातपुडा इंजिनिअरिंगचे केदार पाटील, सतिश पाटील आणि श्रेयस पाटील हे करीत आहेत. या माहितीपट मालिकांचे सर्व भाग सातपुडा इंजिनिअरिंग या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील.