समोर बसलेल्या प्रेक्षकाला जे आवडेल तेच देण्याचा दृष्टिकोन ठेवा – अशोक सराफ
” महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरस्कार तुम्ही मला प्रदान केलात त्याचा मला खूप आनंद आहे कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी महाराष्ट्राची भूमी माझी कर्मभूमी आहे. अशा गोष्टीचा माझा तुम्ही सत्कार करावात याच्यासारखी दुसरी कोणती गोष्ट मोठी असणार नाही, २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे अभिवादन करतो. ज्या लोकांना या अगोदर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ती यादी एवढ्या मोठ्या लोकांची आहे की त्या लोकांच्या पंक्ती मध्ये मला नेऊन बसवलं ही गोष्ट कधीही न विसरण्यासारखी आहे. मला माझ्या या पन्नास वर्षाच्या कारकर्दी मध्ये ज्यांनी ज्यांनी कळत नकळत मदत केली त्यांनी जर मला असा सतत पाठिंबा दिला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पोचलो असतो. तेव्हा ही सगळी त्यांची किमया आहे. या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय बुद्धिमान असून खडूस देखील आहे. त्यांना जर आमचे काम आवडलं तर ते डोक्यावर घेतील, नाही आवडलं तर विचारणार देखील नाहीत. अशा लोकांमध्ये काम करणं ही खरी तारेवरची कसरत आहे. आपल्याला, दिग्दर्शकाला आवडलं न आवडलं याचा काही प्रश्न येत नाही मात्र समोर जो प्रेक्षक बसला आहे त्याला आवडलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि तो दृष्टिकोन मी सतत जपत आलेलो आहे. कारण श्रेष्ठ शेवटी तुम्हीच. तुम्हीच आम्हाला बघायला नाही आलात तर आम्ही काय करायचं, आम्हाला घरीच बसावं लागेल. तुमचे हे जे उपकार आहेत ते मी कधीही फेडू शकत नाही पण माझ्या मनात, माझ्या हृदयात तुमचे हे प्रेम सतत राहील याची मी ग्वाही देतो. ” संस्कृती कार्य विभाग आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ हा स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपले मनोगत मांडले.