‘माई’ संघटने तर्फे ३० रु नाश्ता मिळणेबाबत एसटी अधिकाऱ्यांना निवेदन
मीडिया अशोशिएशन ऑफ इंडिया च्या वतीने एसटी बस थांब्यावरील हॉटेल, मॉल व ढाब्यावर ३० रु नाश्ता मिळणेबाबत निवेदन देण्यात आले. मुंबई सेंट्रल एस टी बस आगाराचे नव्याने पद भार स्वीकारलेले उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भिपनवार यांना सह सचिव चेतन काशीकर, अनिल चासकर आणि वैजयंता मोरे यांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारून विवेक भिपनवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
‘माई’ च्या अध्यक्षा, संचालक शितल करदेकर यांनी सांगितले की, आज सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५८५ बस स्थानकातील १५ हजार ५१२ बसेस दररोज राज्यभरात धावत असतात. या बसेस मधून महिला, पुरुष व लहान मुले असे एकूण ८.७ मिलियन (८७लाख) प्रवाशी यात्रा करतात. महामंडळास या पोटी दररोज जवळपास २४ कोटींचे उत्पन्न प्राप्त होते.
सदरच्या १५ हजार ५१२ बसेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असतानां रस्त्यावर ढाबे, हॉटेल व मॉल आदी ठिकाणी नाश्ता व जेवणासाठी बसेस हमखास थांबतात. अशा सर्व थांब्यावर मालक, व्यवस्थापनाकडून प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. मनमानी दर आकारले जातात. विचारपूस केल्यास उद्धट उत्तरे मिळतात. अनेक ग्रामीण प्रवाशी आपल्या सोबत एक वेळेचे जेवण आणतात ते जेवण करण्यासाठी हाँटेलमध्ये जेव्हा जातात तेंव्हा काही हाँटेलमध्ये घरच्या जेवणास मनाई केली जाते. किंबहूना हाँटेलमध्ये ठळक अक्षरात लिहिलेले असते येथे बाहेरचे अन्न पदार्थ आणण्यास व खाण्यास सक्त मनाई आहे. प्रथमतः ही अट रद्द करण्यास भाग पाडावे. ज्या, ज्या थांब्यावर बस थांबतील मग ते हॉटेल असो, मॉल असो किंवा ढाबे असो तेथे गेल्यावर प्रवाशांनी आपले बस तिकीट हॉटेल व्यवस्थापनास दाखवल्यास त्यांना केवळ ३० रुपयांत नाश्ता द्यायला हवा.
मुंबईचे सचिव सचिन चिटणीस यांनी सूचित केले की, प्रवाशांचा विचार करून परिवहन मंडळाने, तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे. संबंधितांना तसे आदेशाचे पत्र पाठवून “बस प्रवाशांना केवळ ३० रुपयांत नाश्ता मिळेल” असे स्टिकर प्रत्येक बस, हॉटेल, मॉल व ढाब्यावर दर्शनी भागात चिटकवून प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी.