…आजच्या बातम्या संपल्या
‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक वर्षे सांगणारा भारदस्त आवाज आज शांत झाला. सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज (७ जून) निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत प्रदीप भिडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून भिडे यांनी सुरवातीच्या काळात नोकरी केली. प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात आपला खास ठसा उमटवला होता. १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली.
प्रदीप भिडे यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटवला. त्यांनी आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन केले आहे.