मनोरंजन सृष्टीतील अडचणींबाबत सुशांत शेलार यांनी घेतली मुख्यमंत्रांची भेट
मनोरंजन सृष्टीतील अडचणींबाबत शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली या भेटीत मनोरंजन सृष्टीतील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली या चर्चेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे
१. फेब्रुवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे मनोरंजन क्षेत्रासाठी आखून दिलेल्या कार्यप्रणालीचं (SOP) कठोर पालन केलं जावं.
२. टेलिव्हिजन वर काम करणाऱ्या कलावंतांना ९० दिवसांनी मानधन मिळतं ते ३० दिवसांच्या आत दिलं जावं.
३. उपजीविकेसाठी केवळ कलाक्षेत्रावरच अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना लघुउद्योगाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
४. महिला आणि बालकलाकार यांच्या चित्रीकरणाच्या वेळेचे कटाक्षाने पालन करण्यात यावे.
५. एखादी मालिका कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेल्या वेळेच्या आधी बंद झाल्यास निर्मात्याला संबंधित वाहिनींकडून नुकसान भरपाई देण्यात यावी.
६. कलावंत, तंत्रज्ञ यांना विमा कंपन्यांकडून विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे.
७. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांच्या तालमीसाठी महानगर पालिकेकडून माफक दरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
या व अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि त्यांनी या अडचणी सोडवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. लवकरच सिनेसृष्टीतील सबंधित व्यक्तींसोबत यासंदर्भातल्या बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शेलार यांनी सांगितले.