“उलगुलान” सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा
गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या तृशांत इंगळे दिग्दर्शित “झॉलीवूड” या चित्रपटातून झाडीपट्टी रंगभूमीची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा अनेक कारणांमुळे ह्या चित्रपटाला
चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवली होती. देश विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात सुद्धा ह्या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार “झॉलीवूड” चित्रपटासाठी तृषांत इंगळेंला मिळाला आणि पुन्हा एकदा चित्रपटाची गुणवत्ता सिद्ध झाली.
गेल्या वर्षी ५ जूनला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या “झॉलीवुड” या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतेच एक वर्ष झाले आणि याच विशेष दिवसाला तृषांत इंगळेंनी आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली ज्याच नाव आहे “उलगुलान”.
तृषांत इंगळे म्हणाला “उलगुलान” चा अर्थ क्रांती असून हा चित्रपट भारतातल्या आदिवासी समाजावरती भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते ह्या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. नागपूर विदर्भातील सुद्धा कलावंत नक्कीच झळकतील. चित्रपटाचे लेखन पटकथा लेखन पूर्ण झाले असून निर्मितीसाठी ऑगस्ट पासून सज्ज होणार आहे.