सन्मानाने जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’

सन्मानाने जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’

आपण खूप आशा अपेक्षा घेऊन जगतो. खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते ‘खूप काही’ मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो आणि मग खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर “अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं ! हे लक्षात येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आज जगण्याचा उत्सव व्हावा आणि मरणाचा सोहळा व्हावा अशी परिस्थिती किती अभावाने दिसते. आयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार देत जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘फनरल’ हा मराठी चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या लेखक-निर्माते रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत.

नुकताच ‘फनरल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्थैर्यासाठी धडपडणाऱ्या ध्येयवादी हिरा या युवकाची ही गोष्ट आहे. सोबत सदा, सूर्या आणि विनोद हे त्याचे मित्रही आहेत. प्रयत्न करुनही योग्य ती नोकरी, व्यवसाय मिळत नसल्याने कुटुंबाकडून, समाजाकडून होणाऱ्या सततच्या अवहेलनाला कंटाळून हे सगळे एक जगावेगळा व्यवसाय निवडतात. आनंदासाठी, समाधानासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माणसांचा शेवटही आनंददायी व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात. त्यात त्यांना यश मिळतं का? खरंच आयुष्याचा शेवट गोड होऊ शकतो का? या सगळ्याची उत्तर ‘फनरल’ चित्रपट देणार आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नाव कोरणारा हा चित्रपट नक्कीच वेगळा विचार देऊन जातो.

या वेळी बोलताना लेखक-निर्माते रमेश दिघे सांगतात, ‘आपण आनंद शोधत त्यातली गंमत अनुभवणं हे प्रत्येकाने करायला हवं तेच सांगण्याचा प्रयत्न ‘फनरल’ चित्रपटात करण्यात आला आहे. मला असं वाटतं लोकांनी या चित्रपटाविषयी एकमेकांना सांगावे व अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पहावा’. अभिनेता आरोह वेलणकरने याप्रसंगी सांगितलं, ‘माझी यातील भूमिका आणि हा चित्रपट प्रत्येकाला खूप काही देईल’. ‘माझ्या वाटयाला ही भूमिका आली त्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो’. ‘प्रत्येकाचं आयुष्य कशा पद्धतीने सुंदर आणि सकारात्मक होऊ शकतं याचा महत्त्वाचा संदेश देणारा हा चित्रपट पाहून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक वेगळा विचार घेऊन नक्कीच बाहेर पडाल, अशी मी खात्री देतो असं दिग्दर्शक विवेक दुबे यांनी सांगितलं.

‘फनरल’ चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे. क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत.

सन्मानाने जगणाऱ्यांना हसत हसत विचार करायला भाग पाडणारा ‘फनरल’ १० जूनला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns