‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या गुण वर्णनाचे गीत प्रदर्शित
आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्मदिवस या त्रिवेणी मुहूर्तावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर महापराक्रमी, शस्त्र निपुण, युद्धकला पारंगत असे भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. प्रत्येकवेळी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या या महापराक्रमी योध्याचे वर्णन आपल्याला या गीतामध्ये ऐकायला मिळते. प्रचंड ऊर्जा देणारे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्या गुण वर्णनाचे हे गीत प्रणित कुलकर्णी यांनी लिहिले असून संगीत अविनाश – विश्वजित यांचे आहे. आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजात हे गीत ऐकताना व पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो.
या विषयी बोलताना संगीतकार अविनाश – विश्वजित म्हणाले “या चित्रपटाची भव्यता पाहता हे गाणे सुद्धा तेवढे भव्य वाटले पाहिजेच पण ते काळानुरूपसुद्धा वाटले पाहिजे हा विचार डोक्यात ठेऊन आम्ही हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्यामध्ये आम्ही ती भव्यता आणण्यासाठी विशेषतः ढोल, ताशा, हलगी, डफ, बगलबच्चा अशा विविध प्रकारच्या १६ पेक्षा जास्त तालवाद्यांचा वापर केला. तसेच ८ वादक आणि १५ कोरस गायकांच्या साथीने आदर्श शिंदेच्या आवाजात पहिल्याच प्रयत्नात संगीतबद्ध केलेले हे गाणे कुठलाही बदल न करता चित्रपटाच्या प्रसंगात अगदी चपखल बसले याचे आम्हाला आजही अप्रूप वाटते.”
संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.