‘भिक्षुकशाहीचे बंड’ या पुस्तकाचे शताब्दी वर्ष

प्रख्यात विचारवंत केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार झाले ते प्रबोधन या त्यांनी काढलेल्या नियतकालिकामुळे. अतिशय प्रखर व ज्वलंत विचार असलेल्या प्रबोधन नियतकालिकाचा पहिला अंक १६ ऑक्टोबर१९२१ साली प्रसिद्ध झाला. या घटनेला १६ ऑक्टोबर २०२१ रोजी १०० वर्षे पूर्ण होतील. कोरोना साथीचा काळ असूनही प्रबोधन नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात काही ठिकाणी कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. आगामी महिन्यात आणखी काही कार्यक्रम होतील.
प्रबोधनच्या शताब्दीनिमित्त प्रबोधनचे अंक व प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र साहित्याचे दर्शन घडविणारे एक ग्रंथप्रदर्शन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर पूर्व येथील वास्तूतल्या संदर्भ विभागात यंदा जानेवारी महिन्याच्या प्रारंभी भरविण्यात आले होते. प्रबोधनकारांनी सुमारे ४५ पुस्तके लिहिली असे सांगण्यात येते. त्यातील २३ पुस्तके मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे होती. ती सर्व या ग्रंथप्रदर्शनात मांडण्यात आली होती. ती एकत्रितपणे पाहताना खूप समाधान लाभले.
पण त्यातील एका पुस्तकाने खास लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव आहे ‘भिक्षुकशाहीचे बंड’.
‘भिक्षुकशाहीचे बंड’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पुस्तकाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकांपैकी एक असलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती ९ मे १९२१ रोजी प्रसिद्ध झाली. त्या पुस्तकाचे शताब्दी वर्ष संपण्याच्या आत त्याची नवी आवृत्ती अत्यंत सुबक स्वरूपात महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशकाने प्रसिद्ध केली पाहिजे. हे अक्षरधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे.
‘भिक्षुकशाहीचे बंड’ असे पुस्तकाचे नाव देताना प्रबोधनकार ठाकरे यांचा रोख कोणाकडे होता हे वेगळे सांगायची गरज आहे काय?
समाजसुधारणेच्या कळकळीपोटी लिहिलेल्या या पुस्तकाची व त्याच्या कर्त्याची त्या पुस्तकात करून दिलेली ओळख पुढे देत आहे.
भिक्षुकशाहीचे बंड

।। सत्यात् नास्ति परोधर्म ।।

भिक्षुकशाहीचे बण्ड वज्रप्रहार ग्रंथमालेचा हा पहिला ग्रंथ केशव सीताराम ठाकरे वक्तृत्वशास्त्र, कोदण्डाचा टणत्कार, कुमारीकांचे शाप ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास, लाईफ अ‍ॅन्ड मिशन ऑफ रामदास, हिन्दु धर्माचे दिव्य इ. ग्रंथाचे कर्ते यांनी लिहून प्रसिध्द केला.

किंमत फक्त दोन रुपये. पुस्तकें मागविण्याचा पत्ता : केशव सीताराम ठाकरे वज्रप्रहार कार्यालय, २०, मिरांडाची चाळ दादर – मुंबई.

प्रत्येक प्रतीवर ग्रंथकाराची इंग्रजी सही पाहून ग्राहकांनी ग्रंथ घ्यावा. सही नसलेली प्रत चोरीची समजून घेऊ नये. हें पुस्तक मुंबई-भायखळा परेल रोड, घर नंबर ३५४४ तत्वविवेचक छापखान्यात रां विठ्ठल तानाजी मोडक यांनी छापिलें, तें रा. केशव सीताराम ठाकरे यांनी २० मिरांडाची चाळ मुंबई नं. १४ येथें प्रसिद्ध केले.
इतक्या स्वच्छपणे आपली ओळख करून देणाºया प्रबोधनकारांनी भिक्षुकशाहीचे बंड या पुस्तकामध्ये सामाजिक विषमतेवर कठोर प्रहार आहेत. भिक्षुकशाहीबद्दलचे परखड विचार प्रबोधनकार ठाकरे यांच्या भिक्षुकशाहीचे बंड व अन्य पुस्तकांतही मिळतात. भिक्षुकशाहीचे बंड या पुस्तकाचेही शताब्दी वर्ष हे ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून साजरे झाले पाहिजे. केवळ प्रबोधनकारांच्या प्रबोधन अंकांची व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची प्रदर्शने भरवून नव्हेेत.

– अरुण गोविंद केतकर

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns