राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ मांडला. हा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी स्वराज्याच्या चरणी आपला जीव वाहणारे राजांचे साथीदार होतेच पण त्याच बरोबर होत्या पोलादाचं काळीज असलेल्या आणि जिजाऊंच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या स्वराज्यातील सर्व माता !
मी आणि माझं’ या भावनेने प्रत्येकालाच व्यापलं आहे. आपलं स्वराज्य उभं राहील ते ममतेच्या त्यागावर आणि सावित्रीचं व्रत जपणाऱ्या स्त्रीत्वावर. प्रत्येक आईला आपल्या मुलाने दीर्घायुषी व्हावं आणि आपल्या पतीलाही उदंड आयुष्य लाभावं असं वाटत असतं. या अंगाई मध्ये स्वराज्याच्या लढाईसाठी मुलाला तयार करणाऱ्या आईचे कणखर रूप अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने साकारले आहे. असं म्हणतात की मुलाच्या आयुष्यात आईचं स्थान हे तलवारीच्या मागच्या मुठीसारखं असतं. मुठ जितकी घट्ट, तितकी लढाई दमदार! आपला पती आणि पोटचा पोरही आधी स्वराज्याचा आहे ही भावना जपणाऱ्या आणि मायेपेक्षा कर्तव्य निभावणाऱ्या माऊलींना ही शिवकालीन अंगाई समर्पित आहे.
प्राजक्ता माळी हिने हळव्या आणि कणखर आईचे रूप साकारले आहे व हरक भारतीया याने त्या स्वराज्याचा मावळा होण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला लहान मुलगा साकारला आहे. या शिवकालीन अंगाईचे गीत लेखन व दिग्दर्शन अनघा काकडे हिने केले आहे. नुपूरा निफाडकरने ते संगीतबद्ध केले असून तिनेच त्याचे पार्श्वगायनही केले आहे.
ही Do Re-Do प्रोडक्शन्सची निर्मिती आहे व राजश्री मराठी च्या युट्युब चॅनेलवर ही शिवकालीन अंगाई प्रसिद्ध झाली आहे.