वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने माहीम सार्वजनिक वाचनालयात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माहीम सार्वजनिक वाचनालय व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण दिवस वाचनालयात हे कार्यक्रम पार पडले.
वाचनसंस्कृतीवर आधारित वादविवाद स्पर्धा, ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर विद्यार्थ्यांची भाषणे, भारतरत्न बहुमान प्राप्त झालेल्या मान्यवरांशी संबंधित पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन, स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन, डॉ. अविनाश वैद्य यांच्याशी संवाद आदी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले. वादविवाद स्पर्धेत शिल्पा कालेलकर, अमेय पोताडे, स्नेहा कोटियन, शर्वरी खोत, राहुल मयेकर व हुसेन भरमल हे स्पर्धक सर्वोत्कृष्ट ठरले.
‘वाचनसंस्कृती’ या विषयावरील भाषणांत वाचनविषयक विविध पैलूंना विद्यार्थ्यांनी हात घालत त्यांच्यातील वैचारिक परिपक्वता दाखवून दिली.
वाचनालयाच्या सभासदांनी भारतरत्न प्राप्त मान्यवरांच्या पुस्तकांतील उताऱ्यांचे वाचन केले. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजित खराडे यांच्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले.
माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल रुक्मिणी देसाई व सहाय्यक ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांच्यासह सानिका पवार, निलिमा कानडे, हर्षद चौलकर व भास्कर हुलवळे या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांतून वाचनालयात संपूर्ण दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.