राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सोहळा दिल्लीबाहेर आयोजित केला जाणार
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा एका नव्या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ व्या आवृत्तीचे आयोजन प्रथमच दिल्लीबाहेर करण्यात आले आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील एकता नगर येथे हा सोहळा पार पडणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील.
या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये २०२४ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून प्रमाणित झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला आहे. तब्बल ७२ वर्षांच्या इतिहासात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीबाहेर होण्याची पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या आयोजनाची सुरुवात १९५४ मध्ये झाली. त्यावेळी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिला पुरस्कार सोहळा पार पडला होता. त्यानंतर अनेक वर्षे राजधानीतच या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होत आले. त्यामुळे यंदा गुजरातमधील एकता नगर येथे होणारा हा सोहळा ही या पुरस्कारांच्या इतिहासातील महत्त्वाची नोंद ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्ली बाहेर आयोजित केला जाणार आहे.
































