विचार आणि अविचाराच्या उंबरठ्यावरची गोष्ट मांडणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’चा टिझर प्रदर्शित…
आध्यात्म, गूढरहस्य आणि थरारक ॲक्शनचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शीर्षक जाहीर झाल्यापासूनच आपल्या हटके विषयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टिझरनेही प्रेक्षकांची उत्कंठा चांगलीच वाढवली आहे. टिझरमध्ये दाटून आलेले गूढ वातावरण, रहस्याच्या छायेत सुरू असलेला पोलिसांचा तपास, अंगावर काटा आणणाऱ्या रक्तरंजित घटनांचे संकेत आणि देवाच्या दाराशी येऊन थांबणारे अनाकलनीय कथानक यांची प्रभावी झलक पाहायला मिळते. ‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदूर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.
आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. बहुचर्चित आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी ‘देवघर ऑन रेंट’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. टिझरच्या सुरुवातीलाच एका गूढ वातावरणाची निर्मिती केली जाते. मंदिरासारख्या वास्तूतून सुरू होणाऱ्या दृश्यांमध्ये एकामागोमाग एक रहस्य उलगडत जाते. पोलिसांची धावपळ, संशयास्पद हालचाली, रक्ताने माखलेले शस्त्र आणि तणावपूर्ण प्रसंग यामुळे चित्रपटात केवळ अध्यात्माचा विषय नसून त्याला रहस्य आणि ॲक्शनचीही दमदार जोड असल्याचे स्पष्ट होते. टिझरमध्ये काही पात्रांच्या चेहऱ्यांवरील तणाव आणि भावनिक संघर्षही ठळकपणे समोर येतो. त्यामुळे देव, श्रद्धा आणि मानवी कर्म याभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमके कोणते रहस्य दडले आहे, याची उत्सुकता निर्माण होते. ‘कर्म काहीही असो, सगळ्या वाटा देवाच्या दारात जातात’ या गूढ आणि अर्थपूर्ण विचाराभोवती चित्रपटाची कथा गुंफली गेल्याचे जाणवते. त्याचबरोबर ‘विचार आणि अविचाराच्या उंबरठ्यावरची गोष्ट’ अशी आगळीवेगळी ओळख देणारा हा सिनेमा नेमके कोणते रहस्य उलगडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका असून ‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधूर स्वरसाज चढवला असून, कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. डिओपी चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केले आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी घेतली आहे. कला दिग्दर्शनाचे काम दिलीप कंधारे यांनी पाहिले आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी, तर रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.




























