आज सोनियाचा दिन….

आज सोनियाचा दिन….

आज अमिताभचा ८१ वा वाढदिवस. बरोबर ३० वर्षांपूर्वी म्हणजे ११ ऑक्टोबर १९९२ रोजी अमिताभच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या प्रतीक्षा ( त्यावेळेस अमिताभ प्रतीक्षा मध्ये आपल्या आई वडिलां सह राहायचा ) बंगल्यात त्याचा ५० वा वाढदिवस कव्हर करावयास मी व माझा ‘सामना’ मधील मित्र (स्वर्गीय) एकनाथ कदम गेलो होतो.

१५ ऑक्टोबर रोजी सकाळ पुणे मध्ये ‘कलारंजन’ च्या पाहिल्या पानावर माझा ‘सुपरस्टारचा साधा वाढदिवस’ या हेडिंग खाली लेख आला होता.

आजच्या सारखे त्यावेळेस कलाकार फारच कमी पत्रकारांना भेटायचे, अमिताभला भेटणे तर महाकठीणच होते कारण स्टारडस्ट बरोबर झालेल्या काही वादा मुळे अमिताभ याने तब्बल १९७५ ते १९८९ हे १४ वर्षे सर्वच मीडियावर बहिष्कार घातला होता. १९८९ नंतर त्याने हा बहिष्कार जरी उठवला असला तरी अजूनही पत्रकारांमध्ये व अमिताभमध्ये म्हणावे तसे बॉंडींग झाले नव्हते,  पण आम्हा दोघांचे भाग्य थोर ज्या अमिताभची लांबूनही का होईना एक झलक पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी ( १९८३ कुली चित्रपटाच्या वेळेस अमिताभला झालेला अपघात, आणि त्यानंतर अमिताभ आपल्या फॅन्सना दर्शन देण्यासाठी त्याच्या प्रतीक्षा बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत यायचा ) मी प्रतीक्षा बंगल्याच्या समोरील फूटपाथवर तासनंतास उभा असायचो तोच मी आज अमिताभला त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्याच प्रतीक्षा बंगल्यात भेटावयास जात होतो. आणि मी नुसते भेटलोच नाही तर त्याचा बरोबर केक कापला त्याच्या आई वडिलांशी बोलणे झाले. अभिषेक, स्वेता तर खूप लहान होते. ( लेखाचा फोटो टाकत आहे त्यावरून कळेल ) आणि…………आम्ही चक्क अमिताभच्या खास आग्रहास्तव अमिताभच्या प्रतीक्षा बंगल्यात त्याच्या कुटुंबा सोबत जेवलो देखील.

त्यावेळेस अमिताभ बरोबर मी फोटोसुद्धा काढला पण तो इथे टाकत नाही कारण कित्येकांना वाटेल त्यात काय पत्रकार कलाकारां बरोबरचे भरपूर फोटो पहावयास मिळतात पण मला विचारा ३० वर्षांपूर्वी अमिताभ बरोबर फोटो काढणे म्हणजे किती मोठी गोष्ट होती.

लेख ज्या दिवशी पेपरमध्ये आला तो पेपर मी अमिताभ ला पाठवून दिला होता. ( पेपर पुण्याचा असल्याने कदाचित त्याला मिळेल न मिळेल या विचाराने )

दोन दिवसात प्रतीक्षा बंगल्यातुन माझ्या नावावर एक पत्र आले ज्यात लिहिले होते सचिनजी आपण माझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला प्रतीक्षावर आला होतात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपला लेख श्री.खरे ( अमिताभचे त्यावेळचे PA ) यांच्या कडून वाचून घेतला खूप आवडला त्या लेखात आपण जे फोटो वापरले आहेत ते माझ्या खाजगी कलेक्शन साठी मला मिळू शकतील का? ( याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे ) तातडीने मी माझ्या वरिष्ठांची परवानगी घेऊन १० इंच × १२ इंच या साईजचे २५ फोटो स्पीडपोस्ट ने पाठवून दिले. यातील काही फोटो आजही अमिताभच्या बंगल्यामध्ये लावलेले आहेत.

म्हणूनच आज सोनियाचा दिन….

– सचिन चिटणीस

+1
1.3k
+1
856
+1
233
+1
0
IPRoyal Pawns