अल्लड वयातील सारीपाट मांडणार रोमँटिक ‘बाजिंद’
वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या प्रेम या गुलाबी भावनेवर आजवर अनेक मराठी चित्रपट बनले आहेत. बऱ्याच गीतकारांनी रोमँटिक गाणी लिहिली आहेत… संगीतकारांनी संगीताचा सुश्राव्य साज चढवून ती श्रवणीय बनवली आहेत… पण अद्यापही प्रेमाबाबतची सिनेसृष्टीची ओढ तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या याच ओढीने बनवलेला ‘बाजिंद’ हा रोमँटिक मराठी सिनेमा ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सध्या सिनेरसिकांमध्ये कुतूहल जागवण्याचं काम करत आहे.
शान फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘बाजिंद’ चित्रपटाची निर्मिती नंदकुमार शिंदे-सरकार आणि शहाजी पाटील यांनी केली आहे. चित्रपटाची कथा नंदकुमार शिंदे-सरकार यांनी लिहिली असून, पटकथा, संवाद आणि गीतलेखनासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळत शहाजी पाटील यांनी चतुरस्र कामगिरी केली आहे. अल्लड वयातील प्रेमाचा सारीपाट या चित्रपटात मांडण्यात आला आहे. प्रेम कधी, कोणाला, कोणत्या वयात, कोणावर होईल हे सांगता येत नाही. काहींना संपूर्ण आयुष्य गेलं तरी प्रेम मिळत नाही, तर काहींना आयुष्याच्या सुरुवातीलाच प्रेम मिळतं. आपल्या लाडक्या साथीदारासोबत संपूर्ण जीवन जगण्याचं स्वप्न पाहिलं जातं, पण कधीकधी अल्लड वयातील प्रेमात झालेल्या चुकांचा दूरगामी परिणाम होतो. प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी एकमेकांपुढे कोणाचाही विचार करत नाहीत. आजूबाजूला असलेल्या संपूर्ण जगाचा त्यांना विसर पडतो. दोन जीवांना ‘बाजिंद’ करणाऱ्या प्रेमाचीच गोष्ट ‘बाजिंद’मध्ये पाहायला मिळणार आहे. याबाबत दिग्दर्शक शहाजी पाटील म्हणाले की, आजवर रुपेरी पडद्यावर न पाहिलेले प्रेमाचे अप्रकाशित पैलू पाहायला मिळणार हे ‘बाजिंद’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्या मातीतील कथा मोठ्या पडद्यावर पाहताना प्रत्येकाला ती आपलीच वाटावी या भावनेतून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक साधी सरळ कथा कुठेही अतिरंजीतपणा न करता तितक्याच साधेपणानं रसिकांसमोर मांडताना त्याला सुरेल गीत-संगीताची किनार जोडण्यात आली आहे. कलाकारांचा कसदार अभिनय आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारं कथानक रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल असेही पाटील म्हणाले.
राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता हंसराज जगताप या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला पूजा बिरारी ही अभिनेत्री आहे. याखेरीज शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड आदी कलाकारही आहेत. आनंद शिंदे, स्वप्नील बांदोडकर, भारती मढवी, प्राजक्ता शुक्रे, ऋषिका मुखर्जी यांनी गायलेल्या गीतरचना संगीतकार अॅग्नल रोमन यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. वेदिका फिल्म्स क्रिएशन चित्रपटाच्या मार्केटिंग आणि वितरणाची जबाबदारी सांभाळत आहेत. इम्तियाज बारगीर यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, आलोक गायकवाड आणि चंद्रकांत निकम प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक आहेत. अॅग्नल रोमन यांनी पार्श्वसंगीत देण्यासोबतच निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिलं आहे. निखिल गांधी यांनी संकलन केलं असून, कला दिग्दर्शन राजीव शर्मा यांचं आहे. स्थिरचित्रण संजीव राय यांचं असून, संतोष तांबे यांनी कास्टिंग केलं आहे.