कोकणातले गणपती

लेखक : श्रीराम खाडिलकर

कोकणातले गणपती

कोकण आणि गणपती यांचं एक अतूट नातं आहे. आपण  गणपती घरी येतानाची कोकणातली दृश्यं पाहतो किंवा  गणपतीला निरोप देण्यासाठी डोक्यावर घेऊन निघालेला कोकणी माणूस पाहतो त्यावेळी त्याच्या अवतीभवती पसरलेली गवताची हिरवाई आणि त्याच्या बरोबर असलेल्या चाकरमान्यांच्या हालचाली या केवळ सिनेमॅटिक दृश्यं होऊन बसतात.

वर्षभर घाम गाळणारा चाकरमानी जिथे असेल तिथून कोकणात येतो आणि विद्या आणि कलांची देवता असलेल्या गणरायाची शक्य तितकी उत्तम सेवा करायचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या संकटाला धावून येतो तो गणराय अशी  सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच कदाचित कोकणात आपल्याला गणपतीची अनेक देवळं दिसतील. तसंच  कोकणी माणूस तिथं नतमस्तक होतानाही दिसेल.

कोकणातल्या प्रसिद्ध गणपतींचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की रत्नागिरीहून पावसला जाताना उजव्या हाताला वाटेत गणपती गुळे असं लिहून बाण काढलेली पाटी दिसते. तिथेही गणपतीचं मंदिर आहे. या गुळ्याच्या गणपतीला  गोळे फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र विरुद्ध दिशेला असलेल्या पुळ्याच्या गणपतीला मात्र विलक्षण महत्त्व प्राप्त झालं. अत्यंत पवित्र आणि जागृत देवस्थान म्हणून गणपतीपुळे ओळखलं जातं. महाराष्ट्राचा छोटा गडकरी असं बिरुद लाभलेल्या ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांना त्यांनी लिहिलेल्या उठी उठी गोपाला या भूपाळीतली  “सागर तीरी ऋषीमुनींचा वेधघोष चालला” ही ओळ सुचली ती गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. हे कोणाला माहिती नसेल म्हणून सांगतोय. या गणेशाच्या साक्षीने घडलेले असे अनेक प्रसंग कळल्यावर गणपतीवरची श्रद्धा अधिक गहिरी होत जाते.

कोकणातलं असंच आणखी एक प्रसिद्ध गणपतीचे देवस्थान म्हणजे हेदवीचा गणपती. दहा हातांच्या या गणपतीला अनेक लोक प्रचंड मानतात एकतर त्याच्या हातातल्या वस्तू नेहमीच्या वापरातल्या असल्या आणि नसल्या तरीही त्या महत्त्वाच्या आहेत अत्यंत कर्तबगार आणि शूरवीर लोकांकडूनच अशा गणपतीचे पूजन व्हावं असा संकेत असल्याचंही सांगितलं जातं. हा खूप वेगळा प्रकार आपल्याला हेदवीच्या गणपती मंदिरात पाहायला मिळतो. अष्टविनायकातला पालीचा गणपती सुद्धा आपलं स्वतंत्र आकर्षण टिकवून आहे. अष्टविनायक या सिनेमाच्या गाण्यात गणपतीच्या देवस्थानांची किती श्रद्धेनं वर्णनं केली आहेत हे आपल्याला कळतं. या गणरायाच्या कृपेनेच कोकणामधले अनेक नामवंत कलावंत आपले करिअर घडवू शकले असं बोललं जातं. श्रद्धेला मोल नाही असं म्हणतात ते खरंच आहे.

—————————————-

+1
3.8k
+1
2.9k
+1
356
+1
0
IPRoyal Pawns