संगीत ही माझी जीवनरेखा – आशा भोसले
इतिहासाचे साक्षीदार व्हा, संगीतप्रेमींसाठी आयुष्यातून एकदाच मिळणारी संधी:
आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसाचा जल्लोष दुबईत
आनंद भोसले आणि ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पीएमई एंटरटेनमेंट यांच्या वतीने महान गायिका आशा भोसलेंच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अद्वितीय सांगीतिक जलशाचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे. “ASHA@90: लाईव्ह इन कॉन्सर्ट,”च्या माध्यमातून दुबई येथे रंगमंचावर तब्बल दशकभरानंतर ही सुरेल गळ्याची गायिका मोठ्या दिमाखात कला सादर करताना दिसेल. संगीतप्रेमी अतिशय आतुरतेने या इव्हेंटची प्रतीक्षा करत आहेत.
बोनी कपूर, जमील सैदी, नितीन शंकर, सलीम-सुलेमान, पूनम धिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह नामवंत सेलिब्रिटींनी त्यांच्या आगामी मैफिलीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिग्गज आशा भोसले यांचे अतुट कौतुक केले. या खास इव्हेंटसाठी दशकभरानंतर आशा भोसले स्टेजवर जाण्यासाठी सज्ज झाल्याने त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यासाठी व त्यांना पाठबळ देण्यासाठी चाहतावर्ग एकत्र येणार आहे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अनमोल यांनी केले.
या कॉन्सर्टचे आयोजन दुबई येथील जगप्रसिद्ध कार्यक्रमांकरिता लोकप्रिय असलेल्या कोका-कोला अरेना येथे ०८ सप्टेंबर २०२३ रोजी रंगेल. हा असा दिमाखदार सोहळा आयुष्यात एखादवेळी संपन्न होत असतो. या जलशाच्या निमित्ताने आशा भोसले यांच्या आठ दशकांहून अधिक चाललेल्या बहारदार कारकिर्दीला मानाचा मुजरा करण्यात येईल. यावेळी भारतीय सिनेमांत त्यांच्या गायनाने अजरामर करून ठेवलेल्या रचना सादर करण्यात येतील.
पीएमईचे संस्थापक सलमान अहमद म्हणाले, “आम्ही दिग्गज आशा भोसले यांचा ९० वा वाढदिवस दुबईत एका खास मैफिलीसह साजरा करत आहोत, हा आमचा सन्मान असून आम्हाला याचा आनंद वाटतो.” “एका दशकानंतर त्या दुबईत परत येत आहेत. हा अनुभव निःसंशयपणे प्रेक्षकांसाठी नॉस्टॅल्जिक आणि अविस्मरणीय ठरेल. ही मैफल म्हणजे आमच्या वैविध्यपूर्ण प्रेक्षकांकरिता असाधारण संगीतमय कार्यक्रम सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
“ASHA@90: लाइव्ह इन कॉन्सर्ट” हा जगातील पहिला म्युझिकल ब्रॉडवे असेल. ज्यामध्ये गायक सुदेश भोसले आणि इतरांसोबत जादूई सांगीतिक संग्रहाचा समावेश असेल. यामध्ये क्लासिक बॉलीवूड हिट्स, भावपूर्ण गझल आणि संगीतावर अमीट छाप सोडलेल्या सदाबहार गाण्यांची पेशकश होईल. आशा भोसले यांच्या भारतीय आणि जागतिक संगीतातील अमूल्य योगदानाला आदरांजली अर्पण करून त्यांच्या संगीताच्या वारशाची ही मैफिल एक मंत्रमुग्ध करणारा प्रवास ठरेल.”
दिग्गज गायिका आशा भोसले यांनी त्यांचा उत्साह पत्रकार परिषदेत व्यक्त करताना सांगितले, “पीएमई एंटरटेनमेंटने आयोजित केलेल्या या विलक्षण मैफिलीसह माझा ९० वा वाढदिवस साजरा करून, एका दशकाहून अधिक काळानंतर मंचावर परतण्याची तयारी करत असताना मला प्रचंड आनंद आणि कृतज्ञता वाटते आहे. संगीत ही माझी जीवनरेखा म्हटली पाहिजे. माझ्या लाडक्या चाहत्यांसह माझे गाणे शेअर करणे हा एक भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे. मी एकत्र जादुई आठवणी तयार करण्यास आणि संगीताच्या सामर्थ्याने आनंदित होण्यास उत्सुक आहे.”
आशा भोसले हे नाव म्हणजे कालातीत सुरांचे प्रतीक, विविध भारतीय भाषांमधील १२,००० गाण्यांना त्यांचा दैवी स्वरसाज लाभला. त्यांचे अष्टपैलुत्व, उत्कटता आणि रंगमंचावरील लक्षवेधी उपस्थितीने त्यांना एक अतुलनीय सांगीतिक आदर्श बनवले आहे. ज्यामुळे संगीत प्रेमींच्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
आपला उत्साह शेअर करताना आनंद भोसले म्हणाले, “आम्ही आशाजींच्या दुबईतील मंत्रमुग्ध मैफिलीची आतुरतेने वाट पाहत असल्याने मी माझा उत्साह आवरू शकत नाही! त्यांच्या अलौकिक आवाजात वेळ आणि संस्कृतीच्या पलीकडे जाण्याची शक्ती आहे, ज्यामुळे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंद आणि सुसंवाद निर्माण होऊ शकतो. आपण त्यांच्या 90 वा वाढदिवस साजरा करत असताना, हे लक्षात ठेवूया की त्यांचे संगीत म्हणजे केवळ सुरांचा संग्रह नाही; ही भावनांची सिम्फनी आहे. अनेक दशकांपासून त्यांचे सूर मनावर गारूढ करत आहेत. आशाजी, तुमच्या जीवनाचं चिरंतन माधुर्य आणि अनेक वर्षांच्या मंत्रमुग्ध कलात्मकतेसाठी शुभेच्छा!”