निखळ विनोदनिर्मिती करण्यापेक्षाही विनोदी सिनेमाचं परीक्षण करणं आव्हानात्मक… विजय पाटकर

निखळ विनोदनिर्मिती करण्यापेक्षाही विनोदी सिनेमाचं परीक्षण करणं आव्हानात्मक… विजय पाटकर

 

माणसाला एकवेळ रडवणं सोप्पं आहे पण त्याला खळखळून हसवण्यासारखं अवघड दुसरं काम नाही असं म्हटलं जातं. विनोदी नटाला जेव्हा त्याच्या कामाचं समाधान कशात आहे असं विचारलं जातं तेव्हा तर त्याचं उत्तर हेच असतं. मनोरंजन क्षेत्राला तर विनोदाची फार मोठी परंपरा आहे. अगदी दशावतारी नाटकांपासून आजच्या फक्त विनोदनिर्मितीसाठी वाहून घेतलेल्या सिनेमांपर्यंत हा प्रवाह त्या खळाळत्या हास्याइतकाच खळाळता आहे. झी टॉकीजने याच विनोदवीरांच्या अवघड कामगिरीला सलाम करण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नामांकन मिळालेल्या विनोदी सिनेमातून उत्कृष्ट विनोदी सिनेमाची निवड करणं हे परीक्षकांसाठी किती आव्हानात्मक होतं याविषयी परीक्षक आणि विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्ड सोहळा ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना झी टॉकीज या वाहिनीवर पाहता येणार आहे .

झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्यातील एक महत्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे विनोदी सिनेमांसाठी दिला जाणारा पुरस्कार. विनोदी सिनेमा या विभागासाठी परीक्षक म्हणून धुरा देण्यात आली होती ती विजय पाटकर यांच्याकडे. याचनिमित्ताने विनोदी सिनेमासाठी त्यांनी कोणते निकष लावले, विनोदाच्या जातकुळीपासून ते त्याच्या मांडणीपर्यंत परीक्षक म्हणून त्यांच्या दृष्टीकोनाची व्याप्ती कशी होती यावर पाटकर अगदी सखोल बोलले.

विजय पाटकर म्हणाले, एकतर विनोद हा सहजसुंदर असायला हवा. मग तो आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांतून फुलणारा विनोद असो किंवा सिनेमासाठी लिहिलेल्या संहिेतेतला किंवा संवादातला असो. पु. लं. देशपांडे, आचार्य अत्रे यांनी लेखनातून दर्जेदार विनोदाची एक बैठक घालून दिली आहे. सिनेमाच्या बाबतीत सांगायचे तर राजा परांजपे, शरद तळवलकर यांनी विनोदी संवादफेक कशी असावी याची शिकवण दिली आहे. मराठी सिनेमात ऐतिहासिक, तमाशा, ग्रामीण बाज संथ झाल्यानंतर विनोदी सिनेमांचा प्रवाह सुरू झाला. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनी विनोदी सिनेमांचा किल्ला लढवला. पुन्हा मराठी सिनेमाला थोडी मरगळ आली, मात्र गेल्या दहा वर्षात मराठी सिनेमातील विनोदीपटांनी कात टाकली आणि उत्तम विनोदनिर्मिती करणाऱ्या सिनेमांनी मराठी पडदा गाजवला आहे. त्यामुळे अशा वळणावर झी टॉकीजसारख्या वाहिनीसाठी विनोदी सिनेमांमधून उत्कृष्ट सिनेमाची निवड करणं माझ्यातल्या विनोदाची जाण असलेल्या अभिनेत्यातील परीक्षकालाही आव्हान होतं.

विजय पाटकर यांच्या मतानुसार, आजचा मराठीतील विनोदी सिनेमा हा फक्त हसवत नाही तर अंतर्मुख करून जातो, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देऊन जातो. त्यामुळे अशा सिनेमातील संवाद, सीन हे सगळच बारकाईने पाहणं गरजेचं असतं. एखाद्या कलाकाराची एन्ट्री हादेखील विनोदी सिनेमात खळखळून हसवणारा भाग असतो. ती एन्ट्री कशी होते, त्यातून विनोद कसा फुलू शकतो हे सगळं अशा सिनेमांच्या पडद्यामागे काम करणाऱ्या शैलीवर अवलंबून असतं.

झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डसाठी नामांकन मिळालेल्या सिनेमातून सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमांची निवड करताना याच गोष्टी मुख्यत्वे बघितल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे या सिनेमासाठी वापरण्यात आलेली मूळ विनोदी संकल्पना, कथेतील विनोदाची पेरणी याकडे लक्ष दिले. त्यानंतर आजच्या कलाकारांमध्ये असलेली विनोदाची जाण परीक्षण करताना लक्षात घेतली. विजय पाटकर म्हणाले, आजच्या तरूण कलाकारांमध्ये विनोदाची खूप छान जाण आहे. विनोदनिर्मितीसाठी लागणारं टायमिंग कुठेही चुकणार नाही याकडे आजचे कलाकार खूप गांभीर्याने पाहतात हे परीक्षक म्हणून लक्षात आले. स्टँडअप कॉमेडीपेक्षा सिनेमातील विनोदी पात्राला खूप छटा असतात आणि त्या देहबोलीतून तर कधी फक्त डोळे,चेहरा यातील हावभावातून कशा दाखवायच्या ही कलाच आहे. या सगळ्याचा विचार विनोदी सिनेमांमधून अव्वल सिनेमा ठरवताना केला आहे.

परीक्षक म्हणून खरच हे काम अवघड असलं तरी अभिनेता म्हणून मला समाधान देणारं होतं असं विजय पाटकर आवर्जुन म्हणाले. सतत विनोदी सिनेमे करणाऱ्या कलाकारांना तो शिक्का बसण्याची भीती असते. असं यापूर्वी झालं आहे. गंभीर भूमिका करता येणार नाहीत असा समज विनोदी कलाकारांबाबत होतो. पण यापलीकडे जाऊन विनोदी भूमिका हातात आल्यानंतर तिचं सोनं करणारा अभिनयाचा आणि कलाकारांचा वारसा आजचे कलाकार ताकदीने जपत असल्याचं समाधान या स्पर्धेतील सिनेमांचं परीक्षण करताना मिळाल्याचंही पाटकर अधोरेखित करतात. आजच्या काळात अभिनेत्रींनीही आम्ही विनोदनिर्मितीमध्ये कुठे कमी नाही हे दाखवून दिले आहे. शेवटी आपण मनोरंजनात काय शोधतो, तर काही वेळ विरंगुळा मिळावा, व्यथावेदना विसरून खळखळून हसता यावं. आजचा विनोदी सिनेमा यामध्ये नक्कीच यशस्वी झाला आहे ही पावती झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डसाठी विनोदी सिनेमांच्या परीक्षकपदाच्या जबाबदारीने दिली असं सांगताना विजय पाटकर यांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य होतं.

IPRoyal Pawns