आगामी ‘जेता’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
नेहमीच नवनवीन प्रयोग होत असल्यानं मराठी सिनेसृष्टीचं जगभर कौतुक होत असतं. नव्या दमाचे दिग्दर्शक अनोख्या टायटलखाली आशयघन कथानक सादर करत आहेत. अशा चित्रपटांच्या यादीत आपलं नाव सामील करण्यासाठी ‘जेता’ हा मराठी चित्रपट येत आहे. प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचं नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘जेता’च्या मोशन पोस्टरवरून जाणवतं. सोशल मीडियावर ‘जेता’च्या मोशन पोस्टरला पसंती मिळत असून, चित्रपटात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संजू एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘जेता’ या आगामी चित्रपटाची निर्मिती संजय लक्ष्मणराव यादव यांनी केली आहे. टायटलवरून हा चित्रपट एका विजेत्याची कहाणी सांगणारा असल्याचं जाणवतं. नुकताच ‘जेता’चा मोशन पोस्टर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, अभिनेते सुशांत शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख तसेच प्रबोधन कुर्ला आणि पल्लवी फाऊंडेशनचे संस्थापक भाऊ कोरगावकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली. योगेश साहेबराव महाजन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जेता’चं कथानक सत्य घटनांवर आधारीत असून, जीवनात संघर्ष करून शिखरावर पोहोचणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाची कहाणी पहायला मिळणार आहे. मोशन पोस्टर लाँच प्रसंगी दिग्दर्शक योगेश महाजन म्हणाले की, ‘जेता’ हा चित्रपट प्रत्येकाला प्रेरणादायी ठरावा असा आहे. जीवनातील कटू सत्य मांडताना वास्तव दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये वाजणारं गाणं मरगळ आलेल्या मनाला उभारी देणारं असून, चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक संघर्षमयी जीवन जगासमोर येणार आहे. या कथेला कर्णमधूर संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची किनार जोडून बनवलेली एक परिपूर्ण कलाकृती ‘जेता’च्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे.
‘जेता’ची कथा संजय लक्ष्मणराव यादव यांनी लिहिली असून, योगेश सबनीस आणि योगेश महाजन यांच्यासोबत संजय लक्ष्मणराव यादव यांनीच पटकथा लेखन केलं आहे. संवादलेखन संजय लक्ष्मणराव यादव आणि योगेश सबनीस यांनी केलं आहे. नीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे आदी कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. अनिकेत के. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हर्षद वैती यांनी संकलन केलं आहे. मेकअप देवा सरकटे यांनी केला असून, कॅास्च्युम्स प्रतिभा गुरव आणि दीक्षिता थोरे यांनी केले आहेत. नंदू मोहरकर या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर लोकेन ल्युटेर साऊंड डिझाइनर आहेत.