‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा रंगला ५०० वा प्रयोग…
निर्माते व अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ५०० वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात जोशात पार पडला. यावेळी नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले होते. त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गौरी दामले, संजय मोने, आशिष शेलार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीला झालेल्या ५० वर्षांचे औचित्य साधून त्यांचा सत्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रशांत दामले म्हणाले, आमच्या नाटकाचा ५०० वा प्रयोग होत आहे याचा आनंद वाटतो. या निमित्ताने अनेक वर्षांनी कुठल्यातरी मराठी नाटकाचा ५०० वा प्रयोग झाला आहे. सुधीर भट यांनी अनेकवर्षे मला सांभाळले. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मोहन वाघ यांच्याकडून शिस्त कशी असावी आणि काय करायचे नाही, याचे धडे मला मिळाले. मी एकमेव असा गायक कलाकार असेन, की ज्याने अशोक पत्की यांच्याकडे ६३ गाणी गायली आहेत. मी गायक नसूनही इतकी गाणी त्यांच्याकडे गायली आहेत आणि त्यांनी माझा गळा गाता ठेवला. आम्हाला पैसे नकोत, पण आम्हाला आजपर्यंत शासनाने व महानगरपालिकेने जी मदत केली, तीच मदत डिसेंबर २०२३ पर्यंत द्यावी असे मला वाटते.
+1
+1
+1
+1