१५ मे पासून भेटीला येणार मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’
डिस्ने स्टारने नुकतंच ‘प्रवाह पिक्चर’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. १५ मे पासून प्रवाह पिक्चर ही नवी चित्रपट वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.घरबसल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावर पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दर आठवड्याला नव्या सिनेमाचा प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे. मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहने मराठी भाषिक प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रवाह पिक्चरसह प्रवाह ब्रँडचा विस्तार करताना आणि आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक रोमांचक नवीन वाहिनी आणताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबासह उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहण्याची आणि महाराष्ट्राची संस्कृती साजरी करण्यासाठी एकत्र येण्याची संधी निर्माण करत आहोत,” अशी भावना केविन वाझ, नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्स, डिस्ने स्टार, प्रमुख यांनी व्यक्त केली.
प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना ‘पावनखिंड’ या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु होणार आहे. १२ जूनला हा धमाकेदार सिनेमा पहाता येईल. चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. पावनखिंड सिनेमा पहिल्या ५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर ‘झिम्मा’ हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ अभिनीत ‘कधी आंबट कधी गोड’ आणि ‘प्रवास’, सुपरस्टार स्वप्नील जोशीचा ‘बाली’, महेश मांजरेकर यांचा ‘ध्यानीमनी’, मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित ‘कारखानीसांची वारी’ येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
प्रवाह पिक्चर या नव्या वाहिनीच्या लॉन्चची घोषणा स्टार प्रवाहवर रविवारी, ०३ एप्रिल २०२२ रोजी ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’ दरम्यान, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या कलाकारांनी सुप्रसिद्ध मराठी गाण्यांवर अनोखा नृत्याविष्कार सादर केला.