नवोदित कलाकार ते चित्रपट निर्माता हरीश दुधाडेचा रंजक प्रवास

सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत असलेल्या तुमची मुलगी काय करते या मालिकेतील इन्स्पेक्टर भोसले, फत्तेशिक्तमधील बहिर्जी नाईक अशा उत्तमोत्तम भूमिकांतून आपल्या अभिनयाचं नाणं अभिनेता हरीश दुधाडेनं खणखणीत वाजवलं आहे. आगामी पावनखिंड या चित्रपटातही तो आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हरीशची एक नवी इनिंग आता सुरु झाली असून एका मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त असून चित्रपटाचे नाव आणि इतर तपशील लवकरच तो जाहीर करणार आहे.

मुळच्या नगरच्या असलेल्या हरीशने शाळेतल्या एकांकिकांपासून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सवात वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री प्रयोगातील प्रवेश सादर केले. कॉलेजला असताना भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकामुळे हरीश भरत जाधव यांचा फॅन झाला. त्यानंतर पुण्यात शिक्षणासाठी गेल्यावर पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांच्या तीन पत्ती या चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची, त्यानंतर भरत जाधव यांची भेट झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचं नक्की झालं.

अभिनयात करिअर करण्यासाठी म्हणून हरीशनं मुंबई गाठली. “कन्यादान” या मालिकेपासून सुरू झालेला हरीशचा प्रवास आजपर्यंत चढत्या आलेखानं सुरू आहे. गुंडा पुरुष देव, सुहासिनी, माझे मन तुझे झाले, नकळत सारे घडले, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सरस्वती, तुमची मुलगी काय करते अशा उत्तमोत्तम मालिका हरीशच्या वाट्याला आल्या. या मालिकांतून हरीश घराघरांत पोहोचला. तर मेनका उर्वशी, फर्जंद, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांतून हरीशनं अभिनेता म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. आगामी मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित “मनाचे श्लोक” या चित्रपटातही हरीश दिसणार असून नक्षलबाडी, जॉबलेस या वेबसिरीज मध्येही तो झळकला.

आजवरच्या अभिनय प्रवासाविषयी हरीश सांगतो, की पुण्यात असताना श्यामराव जोशी यांच्याकडून अभिनय म्हणजे काय हे शिकायला मिळालं. मालिका करायला लागल्यावर माझ्या सुदैवानं आत्तापर्यंत उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाट्याला आल्या. प्रत्येक मालिका, चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या क्षेत्रात माझे अनेक गुरू झाले. दिग्पाल लांजेकर, भीमराव मुडे, विनोद लव्हेकर असे दिग्दर्शक लाभले. प्रत्येक प्रोजेक्टमधून नवनवे मित्र जोडले गेले. अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटम आणि निर्माती मनवा नाईक यांनी मला कायम मला उत्तम मार्गदर्शन केले सध्या सुरू असलेल्या तुमची मुलगी काय करते या मालिकेतील इन्स्पेक्टर भोसलेच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. चाहत्यांनी दिलेलं प्रेम माझा उत्साह वाढवणारा आहे.

आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मला प्रत्येकवेळी करायला मिळाली. कठीण भूमिकांसाठी दिग्दर्शक आवर्जून मला विचारणा करतात, अभिनेता म्हणून माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. आजुबाजूच्या सर्व कलाकारांकडून शिकून दर्जेदार काम करण्यावरच माझा कायम भर राहील. येत्या काळातही अभिनेता म्हणून आणि निर्माता म्हणून काही उत्तमोत्तम प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस आहे, अशी भावना हरीशनं व्यक्त केली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns