मृत्यूलाही प्रतीक्षा करायला लावणाऱ्या बाजीप्रभूंची झुंज ‘पावनखिंड’ मध्ये

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं वैभव रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ या आगामी चित्रपटात पहायला मिळणार आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान *’पावनखिंड’* चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे.. १८ फेब्रुवारीला *’पावनखिंड’* चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!’ असं म्हणत मृत्यूलाही थांबायला सांगणाऱ्या शूरवीर, महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडें यांच्या शौर्याची यशोगाथा *’पावनखिंड’* या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकल्यानंतर त्यांच्याबरोबर गडावर हिरडस मावळातील बांदलांचा जमाव होता. त्यातील एक हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हिरडस मावळातील बांदल राजांचा हा उजवा हात. ‘बहुत मर्द, मोठा धाडसी, कजाखदार, कटाक्ष, सर्वगुणयुक्त’ असं त्यांचं वर्णन केलं जातं. भोरपासून तीन मैलांवर सिंद हे बाजीप्रभूंचं जन्मगाव आहे. पावनखिंडीच्या झुंजीमध्ये बाजीप्रभूंनी बलिदान केलं आणि बाजीप्रभू हे नाव शिवइतिहासामध्ये अजरामर झालं. अर्ध सैन्य घेऊन गडाच्या दिशेनं निघालेले राजे पोहोचून तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी बांदल सेनेच्या साथीनं घोडखिंडीत अखेरचा श्वास असेपर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या रक्तानं पावन झालेली घोडखिंड पुढे *‘पावनखिंड’* म्हणून ओळखली जाऊ लागली. अंगावर रोमांच आणणारा हा इतिहास *’पावनखिंड’* चित्रपटात पहायला मिळणार आहे.

ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने पुन्हा शिवरायांचं रूप धारण केलं आहे. मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

*१८ फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे*.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns