‘उसासून आलंय मन’चं पोस्टर रिलीज

आजच्या तणावपूर्ण वातावरणात नवनवीन गाणी रसिकांचं मन प्रसन्न करण्याचं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेली पिकल म्युझिक ही संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत मोलाचा वाटा उचलत आहे. ‘लंडनचा राजा’ या गाण्याच्या यशानंतर समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची पिकल म्युझिक आणि शशिकांत पवार यांची प्रस्तुती असलेलं एक सुमधूर नवीन गाणं रसिक दरबारी हजेरी लावण्यासाठी सज्ज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी ‘उसासून आलंय मन’ या नव्या कोऱ्या सिंगलचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

एम. ए. प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘उसासून आलंय मन’ या गाण्याचं मनमोहक व लक्षवेधी पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरवर मधुर हास्य चेहऱ्यावर असलेली एक देखणी तरुणी सायकल चालवत असल्याचं पहायला मिळतं. तिचा पेहराव गावाकडच्या तरुणींसारखा असल्यानं हे गाणं एखाद्या खेड्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आल्याचं जाणवतं. दोन वेण्या, कपाळाला टिकली, कानात झुमके, गळ्यात माळ आणि ब्लाऊज-परकर-ओढणी परिधान केलेली ही तरुणी आहे अभिनेत्री अश्विनी बागल. अश्विनीचा हा पहिलाच सिंगल व्हिडीओ आहे. ‘मन उसासून आलं’ या गाण्याद्वारे ती अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहे. तिच्या जोडीला या गाण्यात रोहन भोसले हा नवा चेहरा झळकणार आहे. या नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री हे ‘मन उसासून आलं’चं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे.

प्रथमच अल्बम करण्याबाबत अश्विनी म्हणाली की, ‘मन उसासून आलं’च्या निमित्तानं प्रथमच अल्बम केला आहे. चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लवकरच माझे सिनेमेही प्रदर्शित होतील. या गाण्याची संकल्पना वैभव भिलारेची आहे. गाणं लिहून झाल्यानंतर वैभव मला भेटायला आला. विकी सक्सेनाच्या साथीनं या गाण्यावर वैभवनं जवळपास तीन महिने मेहनत घेतली. बरेच बदल केल्यानंतर एक श्रवणीय ट्रॅक बनवला. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात हिरवागार निसर्ग असलेलं अचूक लोकेशन आम्हाला मिळाल्यानं तिथं आम्ही ‘मन उसासून आलं’ हे गाणं शूट केलं. अल्बम करण्याची पहिलीच वेळ असल्यानं खूप मजा आली. अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी मला खूप सपोर्ट केला. कोरिओग्राफर पंकज चव्हाण यांनी अत्यंत छान कोरिओग्राफी केली आहे.

‘मन उसासून आलं’ हे गाणं वैभव भिलारेनं लिहीलं असून, गायलंही केलं आहे. वैभवनं विकी सक्सेनाच्या साथीनं या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी करणारा पंकज चव्हाण म्हणाला की, ‘मन उसासून आलं’ हे गाणं आजच्या युथला आवडेल अशा शैलीत तयार करण्यात आलं आहे. शब्दरचने पासून संगीत रचनेपर्यंत सर्वच गोष्टीत नावीन्याची जाणीव होईल. या गाण्याची कोरिओग्राफी करतानाही याची काळजी घेण्यात आली आहे. रसिकांना एका अनोख्या प्रकारची कोरिओग्राफी या गाण्यात पहायला मिळेल. अश्विनी आणि रोहन यांनी ‘मन उसासून आलं’ या गाण्यावर अचूक ताल धरला असल्यानं हे गाणं रसिकांना नक्कीच ठेका धरायला लावेल अशी आशाही पंकजनं व्यक्त केली आहे. अनुप जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या गाण्याची सिनेमॅटोग्राफी सूर्यकांत घोरपडेंची असून, संकलन ऋषिराज जोशीनं केलं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns