“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” किंवा “अशक्यही शक्य करतील स्वामी” या अमृतमय शब्दांची शक्ती अद्वितीय आहे. असुरक्षित मनाला, जीवनाला आश्वस्त करणारी आणि संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देणारी ही संजीवन वचनं आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उद्याची शाश्वती नाही तिथे विशेषत: तरुण पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्वज्ञान दिशादर्शक वाटत आहे… आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही… नामस्मरण हीच पूजा आणि तोच यज्ञ हे त्यांचे सांगणे आहे. त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात… अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे…तेव्हा नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ २८ डिसेंबरपासून सोम ते शनि रा. ९.३० वा. आपल्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर.
आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्या एका इसमाच्या हातून कुर्हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली… तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले… इथून खर्या अर्थाने प्रवास सुरू झाला… अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीत, त्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले… कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
मालिकेबद्दल बोलताना लेखक शिरीष लाटकर म्हणाले, “मुळात श्री स्वामी समर्थ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे .. गेली वीस वर्षं मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि नुसता आनंदच नाही तर हे आव्हानसुद्धा आहे कारण स्वामी चरित्र अफाट आहे. बावीस वर्षांहून अधिक काळ स्वामी अक्कलकोट मध्ये होते .. तिथे त्यांनी शेकडो लीला केल्या आणि स्वामींच्या त्या प्रत्येक लीलेमागे एक अर्थ आहे… एक शिकवण आहे. आपल्याकडे लोक चमत्कार लक्षात ठेवतात पण त्यामागचं तत्त्व लक्षात ठेवत नाहीत. मी तेच तत्त्व उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मनोरंजक पद्धतीने स्वामींची ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न आहे .. एका अर्थाने हे शिवधनुष्य आहे .. आणि ते मी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे”.
स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्य, सुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे… आजच्या काळात यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांचे उपदेश असाधारण शक्ती देऊन जातात… आणि हेच अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय पाहून एक प्रकारचे बळ मिळते… आजच्या विज्ञाननिष्ठ काळात का बरं यांचे तत्वज्ञान धीर देतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत… तेंव्हा नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.