सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन 27, 28 रोजी रवींद्र नाट्य मंदिरात
केदार शिंदे संमेलनाध्यक्ष

मुंबई, : स्वामीराज प्रकाशन आयोजित “सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” यंदा 27 आणि 28 मार्च रोजी रवींद्र नाट्य मंदिर लघु नाट्यगृहात संपन्न होणार आहे. गिरणगावातील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक केदार शिंदे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील. दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत दोन दिवसात कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींचा जागर होणार असून रसिकांना संमेलनात मुक्त प्रवेश आहे.
संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे. संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून लालबागचे नगरसेवक किरण तावडे हे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सोहळ्याचे अध्यक्षस्थान मराठी भाषा मंत्री उदय सामंत भूषविणार आहेत.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनात सुर्वे मास्तरांच्या कविता आणि गिरणगाव यावर सांगोपांग चर्चा होणार आहे.
अशोक नायगावकर, महेश केळुसकर, अशोक बागवे, संतोष पवार, बजरंग चव्हाण, कपिल भोपटकर, सुभाष नकाशे, हेमंत भालेकर, जयेंद्र साळगावकर, दिनेश केळुसकर, अभिनेता स्वप्नील राजशेखर, दिग्दर्शक विवेक देशपांडे आदी अनेक मान्यवर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी गिरणगावातील कवींचेही संमेलन होणार आहे. शिवाय मास्तरांच्या कवितांवरील “चंद्रा” या नाटकाचे आणि “आमच्या या घरात” या नाटकाचे साभिनय अभिवाचन होणार आहे. “ढाकुमाकुम टाकुमाकुम” या सांगीतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होईल.
या संमेलनात गिरणगावकरांनी आणि सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशन या संस्थेने केले आहे.
• राघवकुमार, माटल, बेळेकर यांचा गौरव!
कामगार रंगभूमीवरील लोकप्रिय नाटककार के. राघवकुमार यांना यंदाचा पहिला ” कै. बाबाजी धोंडू शेलार स्मृती गिरणगावातील साहित्य जाबर” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक ” कै. कुमुद गजानन रेगे स्मृती स्वामीराज पुरस्कार” गिरणगावातील ज्येष्ठ कथाकार काशिनाथ माटल यांना जाहीर झाला आहे. या दोघांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शिवाय “गांधी टॉक्स” या बहुचर्चित सिनेमाचे गिरणगावातील दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचाही या संमेलनात खास सन्मान करण्यात येणार आहे.































