कलाकारांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी

सुप्रिया पाठारे – (मोलकरीण बाई मालिकेतील अंबिका)

आम्ही गेली १४ वर्ष गणपतीची प्रतिष्ठापना करतोय. खरतर पाठारे कुटुंबात सर्वांचा मिळून एकच गणपती वर्षानुवर्षे येतोय. पण मुलांच्या इच्छेखातर मी माझ्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना करायला सुरुवात केली. आमच्या घरी शाडूच्या मातीची मूर्ती आम्ही आणतो. सजावट फुलांची असते. थर्माकॉलचा वापर मी पहिल्यापासूनच टाळत आले आहे. खास बात म्हणजे आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी घरातच छोटेखानी कार्यक्रम आयोजित करतो. जवळपास १५० लोकं पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. डान्स, गाणी, धमाल करत आम्ही बाप्पाचं स्वागत करतो. आमच्या घरची आरती स्पेशल असते जवळपास दीड तास घरात आरती चालते. वर्षातला हा दिवस अत्यंत प्रसन्न करणारा असतो. मोलकरीण बाई मालिकेतही आम्ही गणपती विशेष भाग शूट केलाय जो जरुर पाहा.

अजिंक्य राऊत – (विठुमाऊली –  विठ्ठल)

आमच्या गणपती बाप्पाची आरास खुपच खास असते. बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही लाडूंचा वापर करतो. त्यामुळे दरवर्षी मला खूप सारे लाडू खायला मिळतात. यंदा बऱ्याच गणेश मंडळांनी आणि घरगुती गणपतीही विठुमाऊलीच्या रुपात साकारलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या गणपतींचं दर्शन घेण्याची उत्सुकता आहे.

कश्मिरा कुलकर्णी – (श्री गुरुदेव दत्त मालिकेतील अनसुया)

गणपती म्हण्टलं की अगदी प्रसन्न आणि आनंदी वातावरण असतं. कारण बाप्पा हा सर्वांच्याच जवळचं आणि लाडकं दैवत आहे. माझंही गपणपी बाप्पा लाडकं दैवत आहे. लहानपणापासून माझ्या घरी दहा दिवसांचा गणपती असायचा. अनंत चतुर्दशीला होम आणि साग्रसंगीत पूजा झाली की बाप्पाचं थाटात विसर्जन व्हायचं. मी सांगलीची असल्यामुळे आमचं आराध्य दैवतच गणपती आहे. घरापासून अगदी जवळप बाप्पाचं मंदिर असल्यामुळे दररोज न चुकता दर्शन घेण्याची मला सवय लागली. त्यामुळे बाप्पा खूपच जवळचा आहे. घरातल्या बाप्पाची आरास, पूजा याची जबाबदारी माझ्याकडेच असायची. त्यामुळे मंत्र, श्लोक आणि आरत्या अगदी तोंडपाठ आहेत.

नम्रता प्रधान – (छत्रीवाली मालिकेतील मधुरा)

गणपती बाप्पा हे माझं सर्वात आवडतं दैवत. बाप्पाच्या सजावटीपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत सगळ्यात माझा सहभाग असतो. छत्रीवाली मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे गेल्यावर्षी माझ्या घरी छत्रीची सजावट केली होती. यंदा शूटिंगमुळे मला सजावटीमध्ये सहभाग घेता आला नाही, मात्र यावर्षीही सजावटीत छत्रीचा वापर जरुर करा असं मी माझ्या फॅमिलीला आवर्जून सांगितलंय. स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेमुळे मला छत्रीवाली ही नवी ओळख मिळालीय. बाप्पाच्या आशिर्वादामुळेच ही सुवर्णसंधी मला मिळालीय. त्यामुळे यंदाची बाप्पाची आरास छत्रीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

  संकेत पाठक – (छत्रीवाली मालिकेतील विक्रम)

मी मुळचा नाशिकचा. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. माझी आई दरवर्षी घरीच कागदापासून गणपतीची मूर्ती तयार करते. मीही तिला मदत करतो. निसर्ग जपा तरच तो तुमचं रक्षण करेल हा संदेश मला माझ्या कुटुंबाकडून लहानपणापासून मिळत आलाय आणि तोच मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितो.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns