सचिन चिटणीस….
“तुम्ही स्वत:ला विसरता तेव्हा लोकगीत तयार होतं” – प्रसून जोशी यांचा व्हेवज २०२५ मध्ये लोकसंगीतावर दृष्टिकोन!
मुंबईत वांद्रेच्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेल्या व्हेवज २०२५ संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘स्पॉटिफाय हौस: इवॉल्युशन ऑफ फोक म्युझिक इन इंडिया’ या सत्राचे आयोजन करण्यात आले. ‘ व्हेवज २०२५ , कल्चरल्स अँड कन्सर्ट’ या विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या या सत्रात भारतीय लोकसंगीताच्या जिवंत परंपरेवर भर दिला गेला.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आणि कथा सांगणारे रोशन अब्बास यांनी केले. सत्रात गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी, लोकगायिका मालिनी अवस्थी, संगीतकार नंदेश उमप, गायक व संगीतकार पापोन आणि ज्येष्ठ गायिका-कलावंत इला अरुण यांनी सहभाग घेतला.
प्रसून जोशी यांनी लोकसंगीताला “जीवनाचा स्पर्श करता येणारा अनुभव” असे म्हणत, ती एक सामूहिक आणि सातत्याने विकसित होणारी अभिव्यक्ती असल्याचे सांगितले. “तुम्ही स्वत:ला शोधता तेव्हा कविता लिहिता, पण स्वत:ला विसरता तेव्हा लोकगीत तयार होतं,” या त्यांच्या विधानाने चर्चेचा गाभा अधोरेखित झाला.
नंदेश उमप यांनी लोकसंगीताला “ओपन युनिव्हर्सिटी” असे संबोधून तिच्या सर्वसमावेशकतेवर भर दिला. पापोन यांनी त्यांचा सर्बियामधील एक संस्मरणीय क्षण शेअर केला, जिथे आसामी लोकगीते सादर केल्यानंतर संपूर्ण प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा वर्षाव केला. त्यांनी यावर भर दिला की, जेव्हा भारतीय लोकसंगीत प्रामाणिकपणे सादर केली जाते, तेव्हा ती आंतरराष्ट्रीय श्रोत्यांशी खोलवर नातं निर्माण करते.
सर्व पॅनलिस्टनी लोकसंगीताचे मूलभूत भाव जपत त्याचे सादरीकरण नव्या पिढीसाठी आधुनिक रूपात करण्यावर भर दिला.
या सत्रात काही कलाकारांनी उत्स्फूर्तपणे गाणीही सादर केली, ज्यामुळे उपस्थितांना लोकसंगीताचा थेट अनुभव मिळाला. सत्राच्या शेवटी, भारतीय लोकपरंपरेचे जतन व प्रचार यासाठी संस्थांपासून सामान्य श्रोत्यांपर्यंत सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
To read the news in different languages, click on *Click to Translate Language* above.