*संदीप पाठक म्हणतोय ‘जगात भारी पंढरीची वारी’*
*महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा म्हणजे ‘वारी’…*
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे. ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय? उदिष्ट्य काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच इतिहास, वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून सोप्या आणि सध्या शब्दात उलगडत अभिनेता संदीप पाठक यांनी ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे. वारीचा आनंदानुभव देणारं हे गाणं गीतकार गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलं आहे. मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.
अभिनेता संदीप पाठक गेली काही वर्ष या वारी सोहळ्यात सहभागी होतायेत. याबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात कि, ‘हा आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही, त्यामुळेच मी या वारीत सहभागी होत असल्याचे संदीप सांगतात. वारीत सहभागी होणार प्रत्येकजण समाधानाची वाट शोधत असतो. इथे प्रत्येक जण वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. मला ही वारी नवी नसली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. ज्यांना वारीचा सोहळा अनुभवायला मिळत नाही अशांपर्यंत वारीचा प्रत्येक क्षण पोहचवणे, घरबसल्या वारीचं दर्शन त्यांना करून देणे आणि नव्या पिढीला या परंपरेची ओळख व्हावी यासाठी ‘जगात भारी पंढरीची वारी’ या कार्यक्रमाच्या व माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारीच्या अनुभवाचं हेच संचित मनोरंजनाच्या माध्यमातून मी गेली काही वर्ष सातत्याने देत आलो आहे.
आपल्याकडे बऱ्याच गोष्टीचं ‘डॉक्युमन्टेशन’आहे. वारीचं अशाप्रकारचं ‘डॉक्युमन्टेशन’ व्हावं तसेच ‘ऑडिओ व्हिजुअल’ स्वरूपात ते असावं यासाठी ‘जगात भारी पंढरीची वारी’ या गाण्याच्या आणि माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते व्हावं यासाठी मी प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून हे विशेष गाणं मी आपल्या भेटीला आणलं आहे. गाण्याचा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणात रीलच्या माध्यमातून व्हायरल होत असतो. ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे गाणं ही सर्वत्र वाजून हरिनामाचा गजर होऊन त्याच्या भक्तीरसात तल्लीन होण्याचा आनंद ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे गाणं प्रत्येकाला देईल असा विश्वास ही संदीप व्यक्त करतात.