साजिद नाडियाडवाला यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!
हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात निर्माते साजिद नाडियाडवाला आता मराठी चित्रपटसृष्टीत उतरत आहेत. वर्दा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एन्टरप्रायजेस आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाची प्रस्तुती ही नाडियाडवाला यांच्या ‘नाडियाडवाला ग्रॅंडसन’ या संस्थेतर्फे केली जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा सध्या विविधांगी विकास होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नवीन भागीदारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणखी उत्तमोत्तम चित्रपट बनणार आहेत.
चाकोरी मोडणारी कथानके निवडून आशयसमृद्ध असलेली कथानके सादर करण्याच्या उद्देशाने ही नवीन भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे मराठी रुपेरी पडद्यावर एक नवीन जादू घडणार असून त्याद्वारे आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे प्रेक्षकांना दर्शन होणार आहे.
या टीमतर्फे प्रेक्षकांच्या मनाला भिडतील अशी कथानके सादर केली जातील, तसेच त्यातील दृश्यक्रम प्रेक्षकांना मोहित करून टाकील. कथानकाचा आशय हा सर्वोत्तम असेल. तेव्हा अशी स्वप्नवत टीम एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या कोठेही पाहायला मिळालेला नसेल अशी चित्रकलाकृती अनुभवायला मिळणार आहेत.
या भागीदारीबद्दल निर्मात्या वर्दा नाडियाडवाला म्हणाल्या, ‘’मराठी चित्रपटनिर्मितीसाठी सह्याद्री फिल्मबरोबर एकत्र येताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र हीच आमची कर्मभूमी असून मराठी भाषा, मराठी माती, मराठी संस्कृतीबरोबर आमची नाळ घट्ट जुळली आहे. तेजस्विनी पंडित यांच्याबरोबर एकत्र येऊन आम्ही प्रेक्षकांना एक नवीन दृष्टी देणाऱ्या परिणामकारक कथा असलेले चित्रपट सादर करणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल तेजस्विनी पंडित यांची जाण लक्षात घेता तुम्हा प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आम्ही या गौरवशाली मराठी चित्रपटनिर्मितीचा प्रवास सुरू करीत आहोत. त्यासाठी आम्हाला तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मिळावा, अशी अपेक्षा आहे.’’
साजिद नाडियाडवाला आणि वर्दा नाडियाडवाला यांच्याबरोबरील भागीदारीबद्दल निर्मात्या तेजस्विनी पंडित म्हणाल्या, ‘‘हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव असलेल्या नाडियाडवाला यांच्या संस्थेबरोबर मराठी चित्रपटनिर्मितीसाठी एकत्र येणे हा माझा तसेच माझ्या टीमचा सन्मान आहे, असे मी मानते. मराठी चित्रपटसृष्टी ओळखली जाते ती दिग्गज कलावंतांसाठी. या कलावंतांनी आजवर प्रेक्षकांना सदैव लक्षात राहतील अशा कलाकृती दिल्या आहेत. मात्र अजूनही आपण भव्यदिव्य कलाकृतींच्या प्रतीक्षेत असून मार्केटिंगच्या आघाडीवरदेखील आपण अजून थोडे कमी पडत आहोत. मात्र आता साजिद नाडियाडवाला आणि वर्दा नाडियाडवाला यांची साथ लाभल्यामुळे ही त्रुटी भरून काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ही भागीदारी मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकणारी असून त्याद्वारे प्रेक्षकांना लार्जर दॅन लाइफ मनोरंनाचा प्रवास असलेल्या कलाकृती पाहता येतील. या भागीदारीबद्दल आम्ही कमालीचे आनंदित असून आगळावेगळा आशय प्रेक्षकांना सादर करण्याची प्रतीक्षा करीत आहोत.’’
एनजीईचे सादरीकरण, वर्दा नाडियाडवाला आणि तेजस्विनी पंडित यांची निर्मिती आणि त्यांची भागीदारी ही गुणवत्ता आणि कौशल्य यांचा सुरेख संगम आहे.
म्हणूनच आमच्या पहिल्यावहिल्या कलाकृतीच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहा. या नवीन सिनेमॅटिक प्रवासासाठी आम्ही आता सज्ज झालो आहोत.