*ऐतिहासिक भूमिकेत रवी काळे*
*बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार*
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातही ते आता स्वराज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रवी काळे प्रथमच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
आजवर विविधांगी भूमिका साकारणारे रवी काळे आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे सांगतात की, ‘कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. मला ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.